छोट्या पडद्यावरील डान्स रिएलिटी शो सुपर डान्सर ४मध्ये करिश्मा कपूरने हजेरी लावली होती. या विकेंडच्या ‘करिश्मा कपूर विशेष’ भागात अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिच्या कामगिरीला सलामी देण्यात येणार आहे. सगळे स्पर्धक करिश्माच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म करताना दिसले. स्पर्धक परी आणि सुपर गुरु पंकज यांनी ‘आए हो मेरी जिंदगी में’ या करिश्माच्या आवडत्या गाण्यावर परफॉर्म केले आणि आपल्या एक्ट मधून आजोबा आणि नात यांच्यातील गोड नाते दाखवले. तो परफॉर्मन्स पाहून आनंदलेल्या करिश्माने सांगितले की, हा एक्ट पाहताना तिला तिच्या आजोबांची आणि त्यांच्याशी असलेल्या नात्याची आठवण झाली.
‘चालती-बोलती प्रश्नावली’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या परीने करिश्मासाठी एक मोठी प्रश्नावली तयार करून ठेवली होती आणि करिश्मानेही तिला पटापट उत्तरे देऊन खुश केले. परीने तिला विचारले की तुम्हा दोघी बहीणींमध्ये जास्त खट्याळ कोण होते? त्यावर करिश्मा म्हणाली, “मी खूप भोळीभाबडी होते... ती (करीना) खूप द्वाड होती (हसते).” ती पुढे म्हणाली, “लहानपणापासून करीना खूप जिज्ञासू होती. तिला सगळे काही जाणून घ्यायचे असे. ज्ञान मिळवण्यासाठी तिची खटपट सुरू असायची अगदी लहानपणापासून.” करिश्माला अभ्यास करायला आवडत असे का या प्रश्नाचे उत्तर देताना करिश्माने सांगितले की अभ्यासापेक्षा अवांतर गोष्टींमध्ये तिला जास्त रस होता. ती म्हणाली, “मला शाळेत असताना ना, डान्स, वक्तृत्व, स्पर्धांमध्ये फार रुची वाटत असे. मी चांगली खेळाडू आणि कलाकार होते. पण आपल्या सगळ्यांना अभ्यास तर करावाच लागतो, हो ना? शिक्षण हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते. पण अभ्यास करतानाही तुम्ही आपले छंद जोपासले पाहिजेत. मी देखील हेच केले.” तिने कधी शाळा बुडवली का या गीताच्या प्रश्नावर करिश्मा उत्तरली, “(त्या वयात) मी खूप शहाणी मुलगी होते. शाळेत मी खूप नियमित होते. नेमाने शाळेत जायचे आणि गृहपाठ करायचे.” तिने हे सुद्धा सांगितले की, करीना सुद्धा एक चांगली विद्यार्थिनी होती. अभ्यासात हुशार आणि कलांमध्येही चांगली गती असलेली!
परीचे करीना विषयीचे कुतूहल पाहून करिश्माने आपल्या बहिणीला सेटवरूनच फोन लावला आणि परीचे स्वप्न पूर्ण केले. जेव्हा करीनाने सांगितले की, ती परीची आणि तिच्या डान्सची फॅन आहे, तेव्हा तर परीचा आनंद गगनात मावेनासा झाला. करीना कपूर म्हणाली, “मी तुझी फॅन आहे, कारण मी तुझा डान्स पाहिला आहे, आणि तू कसली नाचतेस! मी ही तिथे असते, तर मला तुझा डान्स आज प्रत्यक्ष बघायला मिळाला असता. मी खरं तर सुपर डान्सरचीच फॅन आहे, कारण या शो मध्ये इतके सगळे गुणी डान्सर आहेत! पण परी, तू माझे मन जिंकले आहेस. तैमूरला सुद्धा सुपर डान्सर हा शो आवडतो आणि तो ही तुम्हा सगळ्यांचा फॅन आहे. आम्ही दोघे एकत्र बसून या शो चा आनंद घेतो.”