पहिला इंडियन आयडॉल म्हणजे मराठमोळा अभिजीत सावंत काहीसा काळजीत आहे. एक गोष्ट त्याच्या मनाला खुपतेय. गेल्या अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेली गोष्ट अखेरीस त्याच्या ओठावर आलीच. ती म्हणजे अनेकदा कलाकारांची तुलना दुस-या कोणाशी केली जाते. कधी - कधी कलाकारांना ही बाब अभिमानास्पदही वाटते.
काही वर्षांपूर्वी देशाने एका प्रतिभावान कलाकारला पाहिले. या कलाकाराने आपल्या मधुर आवाजाने आणि संगीतावर असलेल्या प्रेमाने लाखोंची मने जिंकली होती. पहिलाच सुपरहिट अल्बम आणि बॉलिवुडमधील काही चित्रपटांमधील गाण्यांसह अभिजीत सावंत प्रत्येकाच्या आवडत्या गायकांच्या यादीमध्ये सामील झाला. ज्या मंचावर तो स्टार बनला त्याच मंचावर पुन्हा परतणारा अभिजीत सावंत पुन्हा एकदा अनेकांची मने जिंकण्यास सज्ज आहे. यावेळी तो छोट्या पडद्यावर गाण्यांचा नवीन लाइव्ह रिअॅलिटी शो 'लव्ह मी इंडिया' मध्ये कॅप्टनच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिजीत नुकताच विमानतळावर दिसला. त्याला पाहताच अनेक चाहत्यांनी त्याच्या भोवती गराडा घातल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना अभिजीत सावंतलाही खूप आनंद झाला.मात्र काही चाहत्यांना अभिजीत सावंतचा चेहरा क्रिकेटर राहुल द्रविडसारखा वाटला. त्यामुळे त्यांनी राहुल द्रविडशीच बोलत असल्याचे वाटले. लगेच ही बाब अभिजीत सावंतच्या लक्षात येताच त्याने सा-यांना त्याची ओळख करून दिली. मात्र यावेळी नक्कीच अभिजीत दुस-या गोष्टीचाही विचार करत असावा. पहिला इंडियन आयडॉल म्हणून आजही अभिजीतची एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे या क्षेत्रात त्याने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
या साम्याबाबत बोलताना अभिजीत म्हणाला,''कॉलेजमध्ये असताना माझी राहुल द्रविडसोबत तुलना केली जायची. मला कधीच वाटायचे नाही की मी त्याच्यासारखा दिसतो. पण माझे मित्र सतत मला आठवून करून द्यायचे की मी या दिग्गज क्रिकेटरसारखा दिसतो. खरेतर याच विचाराने तो माझ्या आवडीचा व्यक्ती बनला.'' याबाबत एका विनोदीघटनेबाबत बोलताना तो पुढे म्हणाला की, ''कॉलेजमध्ये असताना माझ्यामध्ये व त्याच्यामध्ये इतके साम्य होते की एकदा एकाने मला पाठवलेल्या स्मृतिचिन्हामध्ये राहुल द्रविडच्या फोटोखाली माझे नाव होते आणि माझ्या फोटोखाली त्याचे नाव होते. खूप वर्षांपूर्वी ऑर्कुटया सोशल साईटवर मला ते पाठवण्यात आले होते. आणि त्यामध्ये एक विनोद लिहिला होता, पहा क्रिकेटर कसा रिअॅलिटी शोमध्ये आला.'' हे सांगताना अभिजीत हसत होता.