मुंबई - जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष सध्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे लागले आहे. स्पर्धा सुरू झाल्यापासून सिनेमागृहांच्याही पिचवर क्रिकेटची फटकेबाजी सुरू आहे. या स्पर्धेतील ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ सामना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी सिनेमागृहांची वाट धरली आहे. बऱ्याच सिनेमागृहांमध्ये क्रिकेटचा शो जवळपास ‘हाऊसफुल’ झाल्याचे चित्र आहे.
मागील काही दिवसांपासून मोठा चित्रपट प्रदर्शित न झाल्याने अवकळा आलेली सिनेमागृहे टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे गजबजू लागली आहेत. काहीशी दुष्काळी परिस्थिती अनुभवत असलेल्या चित्रपटगृहांना सध्या जुन्या गाजलेल्या चित्रपटांसोबतच टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा आधार आहे. यातील अत्यंत चुरशीचा ‘भारत विरुद्ध पाकिस्तान’ हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या पडद्याला पसंती देत आहेत. ज्यांना स्टेडिअमवर हा सामना पाहणे शक्य नाही, ते सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर या सामन्याचा आनंद लुटत आहेत. यासाठी मल्टिप्लेक्सपासून एक पडदा सिनेमागृहांपर्यंत सर्वांनीच प्रेक्षकांसाठी जणू रेड कार्पेट अंथरले आहे. ‘२डी हिंदी’ आणि ‘२डी इंग्रजी’ असे क्रिकेट सामन्यांचे विभाजन केले आहे.
विश्वचषकाचा फिव्हरसिनेमाच्या पडद्यावरही क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर चढला आहे. यासाठी २२० रुपयांपासून पुढे ३०० रुपये, ३५० रुपये, ४५० रुपये, ५०० रुपये ते १२०० रुपयांपर्यंत तिकीट दर आहे. पीव्हीआरमध्ये तिकीट दर ६०० रुपये असून, रिक्लायनर तिकीट १३०० रुपये आहे. सिनेमागृहांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंग झाल्याने सामना सुरू होईपर्यंत शो हाऊसफुल होईल.
सिनेमागृहांना आधार टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने सिनेमागृहांना एक प्रकारे आधार देण्याचे काम केले असून, मागील काळात चित्रपटांकडे पाठ फिरवलेल्या प्रेक्षकांची पावले संध्याकाळच्या वेळेत सिनेमागृहांची वाट धरू लागल्याचे चित्रपट व्यवसाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या निमित्ताने खाद्यपदार्थांच्या विक्रीतही वाढ होत आहे.