सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या यशापयशाचं गणित हे त्या चित्रपटाने केलेल्या कमाईवरून मांडलं जातं. १०० कोटींहून अधिकची कमाई करणं हे प्रतिष्ठेचं समजलं जातं. भारतीय सिने जगतामध्ये आजही सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खान यांना बॉक्स ऑफिसवरील हिट मशीन मानलं जातं. या तिघांच्याही अनेक चित्रपटांनी १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट देण्याचा विक्रम या अभिनेत्यांच्या नावावर नाही आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
१०० कोटींची कमाई करणारा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आजपासून सुमारे तीन दशकांपूर्वी प्रदर्शित झाला होता. जगभरात मिळून १०० कोटी कमावणारा हा चित्रपट १९८२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं नाव होतं डिस्को डान्सर. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका केली होती. सोनेरी चमकत्या कपड्यांमध्ये मिथून चक्रवर्ती यांनी केलेला डान्स पाहून तेव्हा तरुणी अक्षरश घायाळ होत असत. डिस्को डान्सरचे दिग्दर्शक बाबर शाह होते. तसेच त्याची कथा राही मासूम रजा यांनी लिहिली होती. या चित्रपटाने रशियातील बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. तिथूनच या चित्रपटाला तब्बल ९० कोटींचा बिझनेस मिळाला होता.
डिस्को डान्सर चित्रपटानंतर १०० कोटींच्या क्लबमधला दुसरा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर २०१४ मध्ये आलेला एक चित्रपट सिनेप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला. या चित्रपटाचं नाव होतं, हम आपके है कौन, हा बॉलिवूडमध्ये १०० कोटींची कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. तसेच सर्वाधिक कमाई करण्याचा या चित्रपटाचा विक्रम अनेक वर्षे अबाधित होता.