Join us

'आधार'शी सिमकार्ड जोडल्यास पद्मावतीचं तिकीट मिळणार फ्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 8:50 PM

पद्मावती सिनेमा पाहण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे.

पद्मावती सिनेमा पाहण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. प्रदर्शित झाल्यानंतर आपण हा चित्रपट मोफत पाहू शकतात. यासाठी तुम्हाला केवळ एक अट पूर्ण करायची आहे. तुमचं सिमकार्ड केवळ आधार कार्डसोबत तुम्हाला जोडावं लागणार आहे. ग्राहकांनी मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडावा यासाठी टेलिकॉंम कंपन्या वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. अशातच आयडिया कंपनीने ही अनोखी ऑफर आणली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत मोबाइल नंबर आधार कार्डसोबत जोडणा-या ग्राहकांना कंपनी 250 रूपयांचं पेटीएम व्हाउचर देत आहे. पेटीएमने पद्मावती सिनेमाचं तिकीट बूक करण्यासाठी या व्हाउचरचा उपयोग करता येणार आहे. प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही ग्राहकांसाठी ही ऑफर असणार आहे. मात्र, केवळ 20 हजार ग्राहकांसाठीच ही ऑफर असणार आहे. आधार कार्ड जोडणीनंतर लकी ड्रॉ काढला जाणार असून लकी ड्रॉमध्ये ज्याला कोणाला व्हाउचर मिळेल त्याला 29 नोव्हेंबरला मेसेज करून त्याबाबत माहिती दिली जाईल.  

पद्मावती वाद - दीपिकाच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण, मुख्यमंत्र्यांनी दिलं सुरक्षेचं आश्वासन

पद्मावती चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पद्मावती चित्रपटात दीपिकाने मुख्य भूमिका निभावली असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. 'जे सी नगर परिसरात जिथे दीपिकाचे आई-वडिल राहतात तिथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत', अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीश नाईक यांनी दिली आहे. 

दीपिका मुंबईत राहत असली तरी ती मुळची बंगळुरुची आहे. दीपिकाचे वडिल आणि माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, आई उज्जाला, बहिण अनिशा आणि आजी अहिल्या बंगळुरुतच राहतात. प्रकाश पादुकोण यांची शहरात बॅडमिंटन अकॅडमीदेखील आहे. 

पद्मावती चित्रपटावरुन सुरु झालेला वाद अद्यापही सुरु असून हरियाणामधील प्रमुख मीडिया कोऑर्डिनेटर सूरजपाल अम्मू यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि संजय लिला भन्साळी यांचं शीर कापून आणणा-याला 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे. याचवेळी त्यांनी चित्रपटात अल्लाऊद्दीन खिलजीची भूमिका करणा-या रणवीर सिंगचे पाय तोडण्याचीही धमकी दिली आहे. 'आम्हाला कायदा घातात घ्यायचा नाहीये. पण जर कोणी आमच्या बहिणी आणि मुलींकडे नजर उचलून पाहिलं तर त्याला शिक्षा करण्यात येणार', असं सूरजपाल अम्मू बोलले आहेत. 

सूरजपाल अम्मू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी राज्य सरकार दीपिका आणि तिच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. सिद्धरमय्या यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे धमकी देणा-यांविरोधात कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. 

'दीपिकाला धमकी देणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी मी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दीपिकाने दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे चित्रपटात फक्त मुख्य भूमिका निभावली आहे. असहिष्णुतेची संस्कृती आणि द्वेष जो भाजपाकडून पसरवला जात आहे त्याचा मी निषेध करतो. कर्नाटक दीपिकाच्या बाजूने उभं आहे', असं सिद्धरमय्या बोलले आहेत. 

टॅग्स :पद्मावतीआधार कार्डआयडिया