Join us

हिरो असशील तर सिद्ध करुन दाखव; अभिनेत्री सविता मालपेकरांचं किरण मानेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 7:53 PM

या प्रकरणी मालिकेत विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकर यांनी किरण मानेंना अभिनेता असशील तर सिद्ध करुन दाखव असं चॅलेंज दिले आहे.

सातारा- अभिनेता किरण माने प्रकरणी आता मुलगी झाली हो मालिकेच्या सहकलाकारांकडून आरोप सुरु झाले आहेत. किरण माने यांनी राजकीय पोस्ट करत असल्याने मालिकेतून काढून टाकल्याचा दावा केला. या प्रकरणाला राजकीय रंग देऊन प्रकरण चर्चेत आणले. परंतु मुलगी झाली हो मालिकेचा राजकीय संबंध नाही. किरण मानेंना राजकीय कारणातून नव्हे तर त्यांच्या वर्तवणुकीवरुन काढल्याचं मालिकेतील सहकलाकारांनी सांगितले आहे.

या प्रकरणी मालिकेत विलास पाटील यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सविता मालपेकर यांनी किरण मानेंना अभिनेता असशील तर सिद्ध करुन दाखव असं चॅलेंज दिले आहे. सविता मालपेकर म्हणाल्या की, अभिनेता किरण माने हे सतत टोमणे मारुन बोलायचे. मीपणा त्यांच्यात होता. या सिरियलचा हिरो मी आहे. मी याला काढून टाकेन, त्याला काढून टाकेन असं बोलायचं. तू जर खरंच हिरो असशील तर सिद्ध करुन दाखव असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या घरातला कर्ता माणूस गेल्यानंतर दशक्रिया उरकून पुन्हा सगळं सुरु होतं. घर थांबत नाही. ही सिरियल कुणासाठी थांबणार नाही. राजकारणी माणसं सिरियल थांबवणार नाही. ही सिरियल थांबली तर १५० माणसांचा रोजगार थांबेल. कोरोना काळात लोकांना काम मिळतंय. या मालिकेने अनेकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे किरण माने नसले म्हणून मालिका बंद होणार नाही असंही अभिनेत्री सविता मालपेकर यांनी सांगितले आहे.

अभिनेत्री दिव्या पुगांवकर हिनेही लावला आरोप

या वादावर भाष्य करताना अभिनेत्री दिव्या पुगांवकर म्हणाली की, सुरुवातीची काही महिने सोडले तर त्यानंतर जे काही सुरु झाले. एकतर मी या शोची हिराईन असल्याने ते त्यांना खटकायचं. त्यावरुन सतत टोमणे मारायचे. माझ्या वडिलांविरोधात बोलले, मला उघडउघड टोमणे मारायचे. माझ्याविरोधात अपशब्द बोलायचे. कुठला बाप आपल्या मुलीला अपशब्द उच्चारतो? असा सवाल दिव्यानं अभिनेता किरण मानेंना विचारला आहे.

तसेच सतत मनस्ताप, मानसिक दबाव आणत होते. मी फार कुणाशी बोलत नसायचे. मी स्वत:ला हिरोईन समजते का? असं बोललं जायचं. मालिकेचे शुटींग थांबणार नाही. ही मालिका सुरुच राहणार आहे. गैरवर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेकडून काढण्यात आले. अचानक त्यांना काढण्यात आले नाही. सेटवर इतर कलाकारांशी जी वागणूक होती ती चुकीची होती म्हणून त्यांना तिनदा वॉर्निंग देण्यात आली होती. वारंवार सांगूनही किरण माने यांच्या स्वभावात बदल होत नव्हता असंही अभिनेत्री दिव्या यांनी सांगितले आहे.

टॅग्स :किरण माने