आयफा अवार्ड्स 2018 चा रंगारंग सोहळा नुकताच प्रेक्षकांना टीव्हीवर पाहायला मिळाला. या पुरस्कार सोहळ्याचे सगळ्यात मोठे आकर्षण हे अभिनेत्री रेखा यांचे नृत्य होते. सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी पुरस्कार सोहळ्यात तब्बल २० वर्षांनंतर परफॉर्मन्स सादर केला. त्यांनी इन आँखो की मस्ती तसेच सलाम ए इश्क यांसारख्या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांचा परफॉर्मन्स संपताच आजच्या पिढीतील प्रसिद्ध कलाकार रणबीर कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, क्रिती सॅनन, दिया मिर्झा आणि श्रद्धा कपूर यांनी स्टेजवर धाव घेत त्यांच्यासोबत त्यांच्या नृत्यातील काही स्टेप्स सादर केल्या आणि सगळ्यांनी त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद घेतले. उपस्थितांनी आणि स्टेजवर असलेल्या सगळ्यांना कलाकारांनी दिलेल्या प्रेमासाठी रेखा यांनी त्यांचे सगळ्यांचे आभार मानले. अनेक वर्षांनंतर रेखा यांना स्टेजवर परफॉर्म करताना पाहाणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच होती. रेखा यांनी अनेक वर्षांनी परफॉर्मन्स दिला असला तरी तो तितकाच दमदार आणि मनोरंजक होता. रेखा यांच्या परफॉर्मन्समुळे आयफाला चार चाँद लागले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
रेखा यांच्याप्रमाणेच वरूण धवन, रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा, क्रिती सॅनन, मौनी राय यांनी दमदार परफॉर्मन्स सादर केले. या कार्यक्रमाच्या ग्रीन कार्पेटवर श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अनिल कपूर, अर्जुन कपूर, वरूण धवन, कार्तिक आर्यन यांसारखे कलाकार अवतरले होते. करण जोहर आणि रितेश देशमुख यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांच्या जुगलबंदीने स्टेजचा पूर्णपणे ताबा घेतला.
या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री विद्या बालन आणि मानव कौल यांच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना ‘मॉम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. श्रीदेवींचे पती बोनी कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर अभिनेता इरफान खान याने आपले नाव कोरले़ ‘हिंदी मीडियम’साठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी मेहर हिजला बेस्ट सर्पोटिंग अॅक्टर फीमेल आणि मॉम या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बेस्ट सर्पोटिंग अॅक्टर मेलचा पुरस्कार मिळाला.