अबुधाबी येथे 22 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा (IIFA awards 2022) दणक्यात पार पडला. या रंगारंग सोहळ्याला बॉलिवूडसह मराठीतील कलाकारांनीही हजेरी लावली. इतकंच नाही तर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar ) हिने यंदाच्या आयफा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.
यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन हिने आपल्या नावावर केला. ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिला या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. याच चित्रपटासाठी सईनं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.
गतवर्षी ओटीटीवर प्रदर्शित झालेला ‘मिमी’ हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. क्रितीच्या कामाचं कौतुक झालं होतं. शिवाय या चित्रपटातील मराठमोळ्या सईचा अभिनय पाहूनही प्रेक्षक सुखावले होते. यात सईने क्रितीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. क्रिती एका विदेशी जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते आणि यानंतर तिचं अख्ख आयुष्य बदलतं, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात क्रिती व सईशिवाय पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक, एव्हलिन एडवर्ड्स, एडन व्हायटॉक सहाय्यक भूमिकेत आहेत.
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेहरशाह’ चित्रपटाने यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा आयफा पुरस्कार पटकावला. या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णु वर्धन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ‘सरदार उधम’ या चित्रपटासाठी अभिनेता विकी कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सईच्या लुकची चर्चा
सईचा आयफा अवार्ड सोहळ्याततील लुक पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला. साईशा शिंदे हिनं तिचा हा ड्रेस डिझाईन केला होता. ब्लॅक ब्लाऊज आणि व्हाईट झगमगता घेर असलेला मोठा स्कर्ट, त्यावर वेस्टर्न ज्वेलरी अशा सईचा लुक होता. सई नुकतीच ‘पेट पुराण’ वेबसिरीजमध्ये झळकली होती. याशिवाय तिची इ ए रोजगार नावाची युट्युब सिरीज सुद्धा भाडीपा चॅनेलवर चालू आहे.