प्रेमाच्या सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री अशा ‘फुल ऑन’ अंदाजात हा सोहळा रंगला. पहिल्या प्रेमाची गोड आठवण करुन देणाऱ्या 'इलू इलू' सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीत व्हायरल झालाय. या सिनेमातून बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री एली अवराम पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसणार आहे.
इलू इलूचा ट्रेलर
प्रेम जगातली सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येत. प्रत्येकजण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रेमात पडतोच. प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात.नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या प्रेमाची लव्हेबल गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटात पहाता येणार आहे. नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा फ्रेश चित्रपट प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची नक्की आठवण करून देईल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. ‘इलू इलू’ च्या निमित्ताने वेगळी भूमिका आणि मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद एली आवराम हिने यावेळी बोलून दाखविला.
https://www.instagram.com/reel/DE150t6BISo/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
एली अवरामची मराठीत एन्ट्री
बॉलीवूड गाजवलेली प्रसिद्ध अभिनेत्री एली आवराम हिने 'इलू इलू' चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एलीनं आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या चित्रपटात एली ‘मिस पिंटो’ या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
कधी रिलीज होणार इलू इलू?
एली सोबत मीरा जगन्नाथ, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात,अंकिता लांडे, निशांत भावसार, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात आहेत. ‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. हा सिनेमा ३१ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.