Join us

"मला अत्यानंद झालाय"; बिग बींचा फोटो शेअर करत थलायवाने दिलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:32 PM

रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' (Thalaivar 170) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे.

भारतीय सिनेसृष्टीतील दोन महानायक म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत. दोन्ही अभिनेत्यांची सिनेसृष्टीतील कारकीर्द अफलातून असून जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही एकत्र हिंदी सिनेमात काम केलं आहे. मात्र, त्यानंतर रजनीकांत दाक्षिणात्य सिनेमांत सेट झाल्यामुळे त्याने हिंदीऐवजी दाक्षिणात्य सिनेमांना प्राधान्य दिले. तर, बिग बी अमिताभ यांनी हिंदी सिनेमांतून बॉलिवूडमध्ये शिर्ष स्थान निर्माण केलं. आता, पुन्हा एकदा या दोन दिग्गजांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. स्वत: थलायवा रजनीकांतने याची माहिती दिली. 

रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' (Thalaivar 170) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आता अमिताभ बच्चन यांचीही एन्ट्री झाली आहे. मेकर्सने सिनेमाचं पोस्टर शेअर करताना, 'थलायवर 170' मध्ये अमिताभ यांच्या एन्ट्रीमुळे सिनेमा वेगळ्याच उंचीवर पोहोचला असल्याची पोस्ट केली होती. वाईएलसीए प्रोडक्शन हाऊसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली होती. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि सिनेमाचं टायटल दिलं होतं. आता, रनजीकांतने ट्विट करुन या सिनेमाबद्दल माहिती दिली.

तब्बल ३३ वर्षानंतर मी पुन्हा एकदा माझे मार्गदर्शक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत आहे. टी.जे. ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी "थलाईवर 170" सिनेमात आम्ही दोघे पुन्हा काम करत आहोत. माझे हृदय आनंदाने धडधडत आहे, असे ट्विट रजनीकांतने केले आहे. बिग बींगसोबत स्क्रीन शेअर करताना झालेल्या आनंदाबद्दल रजनीकांतने ट्विटरवरुन भावना व्यक्त केल्या आहेत. 

अनेक चित्रपटांत एकत्र काम

दरम्यान, ९० च्या दशकात बिग बी आणि रजनीकांत यांची जोडी एकत्र दिसली होती. १९८३ मध्ये 'अंधा कानून' आणि १९८५ मध्ये 'गिरफ्तार' या चित्रपटात दोघांची भूमिका होती. तर १९९१ साली रिलीज झालेल्या 'हम' या सिनेमात त्यांनी शेवटची स्क्रीन शेअर केली होती. आता तब्बल ३३ वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा या दोन दिग्गज कलाकारांना थलैवार १७० या सिनेमात एकत्र पाहता येणार आहे. सिनेमाच्या शूटला सुरुवात झाली असून अमिताभ बच्चन यांचा हा पहिलाच तमिळ सिनेमा असणार आहे. यामध्ये राणा दगुबत्तीचीही मुख्य भूमिका आहे. 

टॅग्स :रजनीकांतबॉलिवूडअमिताभ बच्चनसिनेमा