-रवींद्र मोरे
अबीर सूफी सध्या ‘मेरे साई -श्रद्धा और सबूरी’ या मालिकेत साई बाबा यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या भूमिकेमुळे अबीरची घराघरातून प्रशंसा होत आहे. अबीरचा इथपर्यंतचा प्रवास खूपच इंटरेस्टींग आहे. त्याने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. मात्र त्याने वकीली व्यवसाय सोडला आणि अभिनय क्षेत्रात आला, कारण त्यांला खोटे बोलणे पसंत नव्हते. अबीरचे खरे नाव वैभव सारस्वत आहे, मात्र तो स्वत:ला ना हिंदू मानतो ना ही मुस्लिम. यासाठीच त्याने स्वत:साठी अबीर सूफी या नावाची निवड केली आहे. एकंदरीत आतापर्यंतच्या प्रवासाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...
* या शो प्रसारित होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे, आणि साई बाबांच्या समाधीला १०० वर्ष पूर्ण होत आहेत, याबाबत काय सांगशिल?- मला साई बाबांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याबाबत मी स्वत:ला खूप धन्य मानतो. माझ्यावर बाबांचाच आर्शिवाद होता म्हणून एक ते दिड हजार आॅडिशन्समधून माझी निवड झाली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. शिवाय साई बाबांच्या समाधीलाही १०० वर्ष पूर्ण होत आहेत, त्यातच भक्तांची बाबांवरची भक्ती पाहता मी बाबांची भूमिका साकारत असल्याने मला मनस्वी खूपच आनंद होत आहे.
* तू तुझ्या लुकवरून खूपच मॉडर्न वाटतो, तर ही भूमिका साकारत असताना तुझ्या व्यक्तिगत आयुष्यात काय बदल घडला?- होय, माझा मॉडर्न लुक आहे, आणि मी वास्तविक आयुष्यात संत नाही. मात्र ही भूमिका साकारताना माझ्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून आला आहे. अगोदर मी खूपच संतापी होतो, थोडथोड्या गोष्टींनी लवकर संताप यायचा, नाराज व्हायचो. मात्र या भूमिकेमुळे माझी पेशन्स लेवल नक्कीच वाढली. म्हणजे मी आता लवकर संताप व्यक्त करत नाही. स्वत:वर खूपच संयम ठेवायला शिकलो.
* आतापर्यंत अनेक धार्मिक शोज आले आहेत, तर या शोचे वेगळेपण काय आहे?- या शोला सर्व धर्माचे आणि सर्व देशातील लोक फॉलो करत आहेत, हेच या शोचे वेगळेपण आहे. फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही कान्याकोपऱ्यात साई बाबांचे मोठे भक्त आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावर हा शो बघीतला जातो.
* या इंडस्ट्रीकडून तुला काय अपेक्षा आहेत?- इंडस्ट्री आपल्या ठिकाणी अत्यंत योग्य आहे, फक्त यात काम करण्याऱ्यांनी स्वत:त बदल घडून आणला पाहिजे. जग हे कधी वाईट नसते, वाईट असतो तो आपल्या बघण्याचा दृष्टिकोन. जगाला बदलवण्यापेक्षा स्वत:त बदल केला तर जग आपोआपच बदलेलं दिसतं. यासाठी प्रत्येकाने स्वत: वर काम केलं पाहिजे.
* स्क्रिप्टची निवड करताना तू कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो. - संबंधीत भूमिकेचं किती महत्त्व यावर मी जास्त भर देतो. त्या भूमिकेचा प्रवास किती आणि कसा आहे, हे देखील मी आवर्जून पाहतो. विशेषत: भूमिकेची निवड मी न करता भूमिकाच माझी निवड करत असते, असा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.