Join us

परफेक्शनको इम्प्रूव्ह करना मुश्कील हैं, भय्या!

By admin | Published: December 17, 2014 2:26 PM

मनमोकळ्या गप्पा: आमीर, अनुष्का, विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी जेव्हा 'पीके'ला घेऊन 'लोकमत'ला भेटतात..

नागपुरकर राजू हिरानी आणि 'लोकमत' परिवार
 
मनमोकळ्या गप्पा: आमीर, अनुष्का, विधू विनोद चोप्रा आणि राजू हिरानी जेव्हा 'पीके'ला घेऊन 'लोकमत'ला भेटतात..
मुंबई : ''अरे यार, उस ट्रान्झिस्टर से इतना मत डरना, आप जब फिल्म देखेंगे तो पक्का आपको पता चलेगा, की इसमे मैने कोई गलत बात नही की है.,'' आमीर खान गालातल्या गालात हसत (पुन्हा तेच) सांगतो, तेव्हा शेजारी बसलेल्या अनुष्का शर्माला हसू आवरत नाही.
''ये पीके है कौन? एलीयन है क्या? उसके कपडे इतने क्यू चमकीले है? वो ऐसे क्यूं देखता है? अब क्या बताऊं? बस इतना समझीये, की आप जब उसे मिलेंगे तोही आपको पता चलेगा.'' उलटसुलट प्रश्नांना अजिबात दाद न देता राजू हिरानी (पुन्हा तेच) सांगतात, तेव्हा त्यांच्या नजरेतली मिश्कील चमक लपत नाही.
विधु विनोद चोप्रा तर आपल्या दिग्दर्शकाच्या 'इमेज'वर इतके फीदा की ते म्हणतात, आपको राजू का पता है ना? बात बडी करेगा, लेकीन ऐसे करेगा की आप हसते हसते पागल हो जायेंगे. बस वही है पीके!
या शुक्रवारी पडद्यावर अवतरणारा पीके कोण आहे? तो असा का आहे? या उत्सुकतेने मुंबईच्या ताज लेण्ड्स एण्डमध्ये जमलेल्या 'लोकमत परिवारा'ला उत्तरांऐवजी मिळाले ते नवे प्रश्न आणि बॉलीवूडमधल्या सध्याच्या 'द बेस्ट टीम'ला पुरत्या पछाडून टाकणार्‍या पीकेच्या अजब दुनियेचे काही धमाल नजारे. एका रंगीन संध्याकाळी रंगलेल्या या गप्पांमध्ये आमीर खान, अनुष्का शर्मा, राजू हिरानी आणि विधु विनोद चोप्रा या चौघांनी पीकेबरोबरच्या त्यांच्या प्रवासाची कहाणी तर सांगितली, पण हा प्रवास प्रेक्षकांना नक्की कोणत्या गावाला घेऊन जाणार आहे, हे मात्र मोठय़ा चतुराईने गुलदस्त्यातच ठेवले.
बॉलीवूडच्या कुठल्याही चौकटीत न मावणारे पीके नावाचे एक अजब पात्र उभे करणे हे माझ्या आजवरच्या प्रवासातले सर्वांत कठीण आव्हान होते अशी कबुली देणारा आमीर 'परफेक्शनको इम्प्रूव्ह करना कितना मुश्कील होता है' हे सांगताना राजू हिरानी नावाच्या 'क्रिएटिव्हिटी'समोर उभे राहणे कसे परीक्षा पाहणारे असते याचे वर्णन करत होता.. तर एका बाजूला 'आमीर सर' आणि दुसरीकडे 'राजू सर' यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करताना प्रत्येक क्षणी कसे आयुष्यभराचे शहाणपण मिळते, हे सांगणारी अनुष्का कृतज्ञतेने अखंड भारावलेली होती.
वर्ष सरत असताना प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातलेली सर्वाधिक चर्चेतली कलाकृती म्हणून पीकेबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, तिला आकार देणार्‍या चौघांना भेटणे हा उपस्थितांसाठी अत्यंत समृद्ध करणारा अनुभव होता. 'लोकमत'च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी या गप्पांचे सूत्रसंचालन केले.
आमीर खान याने त्याची सहकलाकार अनुष्का शर्मा आणि दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी यांच्यासोबत 'लोकमत'च्या सहकार्‍यांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. निमित्त होते ते त्याच्या आगामी 'पीके' चित्रपटाच्या प्रमोशनचे. नागपुरकर राजू हिरानी आणि 'लोकमत' परिवार आधी इंजिनीअरिंग अध्र्यावर सोडून कॉर्मसचा रस्ता धरलेला. त्यात सी.ए.ची परीक्षा तोंडावर आल्यावर भीतीने लटपटणारे पाय घेऊन वडिलांसमोर जायचे. ''मी सी.ए.ची परीक्षा देणार नाही, मला सिनेमात जायचे आहे,'' हे सांगण्याची हिंमत करायची आणि मान खाली घालून आपल्या भविष्याचा फैसला ऐकायचा!! थेट 'थ्री इडियट्स'मधून उचलून आणल्यासारखा वाटावा असा हा प्रसंग राजू हिरानींच्या आयुष्यात घडला तेव्हा हिरानी कुटुंबीय नागपुरात राहत होते. त्यांचा 'लोकमत'शी संबंध तेव्हापासूनचा. ''हम लोग नाटक-वाटक करते थे और 'लोकमत'मे जाके रिक्वेस्ट करते थे, की साब, कुछ तो लिखिये हमारे बारे मे''- धडपडीच्या वयातली ही आठवण राजू हिरानींनी सांगितली, तेव्हा आमीर खानसह सर्वांनीच या अनोख्या योगायोगाला दिलखुलास दाद दिली.