‘किसिंग किंग’ नावाने ओळखला जाणारा इम्रान हाश्मी हा रुपेरी पडद्यावर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहंमद अझहरुद्दीनची भूमिका साकारणार आहे. निर्माती एकता कपूरही अझहरुद्दीनच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात व्यस्त आहे. अँथनी डिसुझा हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. डिसुझानेही या गोष्टीला दुजोरा दिला. ‘एकताच्या चित्रपटाचे दिग्दर्शन मी करणार आहे ही खरी गोष्ट आहे; परंतु आताच याबाबत बोलणो घाईचे ठरेल,’ असे त्याने सांगितले. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आम्ही या चित्रपटाचे शूटिंग करणार आहोत; परंतु इम्रानशिवाय अन्य कलावंतांची निवड अद्याप बाकी आहे, असे त्याने स्पष्ट केले. खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपटांचा ट्रेंड सध्या बॉलीवूडमध्ये आला आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’यासारखे चित्रपट हिट ठरल्याने अशा चित्रपटांना मागणी आहे. अझहरुद्दीनचे जीवन एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नसल्याने एकताने त्याच्यावर आधारित चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला आहे.