इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ या सिनेमाने रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. करिना कपूर आणि शाहिद कपूरची सिनेमातील लव्हस्टोरी प्रत्येकालाच भावली होती. बेबोच्या खट्याळ अदांनी सजलेला हा सिनेमा प्रदर्शित होऊन बरीच वर्षे झालीत. पण आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, या चित्रपटासाठी आधी बॉबी देओलला विचारणा झाली होती.
होय, आधी मेकर्सनी बॉबी देओच्या नावाला पसंती दिली होती. शाहिद कपूरची एन्ट्री ब-याच उशीरा झाली. ते सुद्धा करिना कपूरच्या हट्टापायी. होय, करिनाच्या हट्टापायी बॉबी या चित्रपटातून बाद झाला अन् त्याच्या जागी शाहिद कपूरची वर्णी लागली. ‘जब वी मेट’ हा चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अलीचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे या चित्रपटासाठी तो कोणतीही तडजोड करण्याच्या मूडमध्ये नव्हता. या चित्रपटासाठी त्याने बॉबी देओलची निवड केली होती. बॉबीची निवड केल्यानंतर इम्तियाजने चित्रपटाच्या निर्मितीसाठी अष्टविनायक प्रॉडक्शनची भेट घेतली. परंतु अष्टविनायक प्रॉडक्शन या चित्रपटात करिना कपूर हवी होती.
करिना असेल तरच आम्ही हा चित्रपट प्रोड्यूस करू,अशी अट अष्टविनायक प्रॉडक्शनने ठेवली. कारण त्यावेळी करिना यशाच्या शिखरावर होती. करिनाच्या नावाला कुणाचाच विरोध नव्हता. ना इम्तियाजचा, ना बॉबीचा. दोघांनीही तिच्या नावाला होकार दिला. त्यानुसार, करिनाशी संपर्क केला गेला. पण करिना म्हटल्यावर ती सहज कशी मानणार? तिनेही अट ठेवली. होय, शाहिद कपूर हिरो असेल तरच मी हा चित्रपट करणार, ही तिची अट होती. असे का याचा अंदाज तुम्हीही बांधू शकता. याचे कारण म्हणजे, करिना त्यावेळी शाहिदला डेट करत होती. म्हणून तिला शाहिद हवा होता.
तिच्या या अटीने सगळ्यांचीच गोची झाली. अखेर इम्तियाजला करिनाची ही अट मान्य करावी लागली. मग काय, बॉबी देओलचा पत्ता आपोआट कट झाला. पुढचा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच. ‘जब वी मेट’ सुपरडुपर हिट ठरला. केवळ शाहिद, करिनाच्याच नाही तर इम्तियाज अलीच्याही करिअरमधला हा चित्रपट एक माइलस्टोन ठरला.