झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत ६ जानेवारीला सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. नुकतेच या मालिकेत ‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली सुरुची अडारकरची एन्ट्री झाली आहे. तिच्या एंट्रीमुळे मालिकेत मोेठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नेत्रा,इंद्राणी,शेखर आणि अव्दैत त्रिनयना देवीच्या मंदिरात, मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी भुयार खोदायचं ठरवतात. तर दुसरीकडे रूपालीसुद्धा पंचपिटिका रहस्यातील चौथी पेटी आपल्याला कशी मिळेल, याचा विचार करते. त्याचवेळी विरोचकाचा सेवक असलेला नाग तिथे येतो. नागामुळे रूपालीला पेटी कुठे आहे, हे कळतं. रूपाली नागाला आज्ञा देते की मला पेटीकडे घेऊन चल, त्याप्रमाणे तो नाग रूपालीला त्रिनयना देवीच्या मंदिरात घेऊन जातो. नेत्रा आणि अव्दैतसुद्धा रात्रीच वावोशीला जायचं ठरवतात.
रूपाली त्रिनयना देवीच्या मंदिरात पोहोचते. रूपालीमध्ये संचारत असलेला विरोचक देवीला आव्हान देतो. त्यानंतर सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होतो. आता हे सर्वात मोठं रहस्य काय असेल, पंचपिटिका रहस्यातील चौथी पेटी कशी आणि कुणाला सापडणार हे सर्व प्रेक्षकांना ६ जानेवारीला रात्री १०.३० वाजता पहायला मिळणार आहे.
सुरूचीने तब्बल ८ वर्षांनंतर झी मराठीवर केलं कमबॅक‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसोबत सुयश टिळक मुख्य भूमिकेत होता. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा झी मराठीवर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.