बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या तिच्या 'सिटाडेल' (Cidatel) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रियांका मुलाखती देत आहे, ज्यात ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरही देताना दिसत आहे. एका मुलाखतीत प्रियांकाने पहिल्यांदा अमेरिकेत गेल्यानंतर तिच्यासोबत नेमके काय घडले, याबद्दलचा अनुभव शेअर केला आहे.
एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिच्या परदेशातील भीतीदायक अनुभवाबद्दल सांगितले. प्रियांका म्हणाली जेव्हा ती शिक्षणासाठी पहिल्यांदाच अमेरिकेत आली होती. तेव्हा ती खूप घाबरली होती. त्यावेळी ती किशोरवयात होती आणि पहिल्यांदाच अमेरिकेत आली होती तेव्हा ती खूप घाबरली होती. सुरुवातीच्या काळात ती खूप दडपणाखाली जगत होती. ती इतकी घाबरली होती की ती तिचे दुपारचे जेवण बाथरूममध्येच खात असे.
अमेरिकेत सुरुवातीचे काही आठवडे प्रियांका चोप्रा दडपणाखालीच होती. अमेरिकेत तिला रुळायला बराच वेळ लागला. आत्मविश्वासाची कमी, भीती आणि एकाकीपणामुळे तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ती म्हणाली की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी माझे दुपारचे जेवण बाथरूममध्ये करायचे. कारण मी खूप घाबरले होते. कॅफेटेरियापर्यंत कसे जायचे आणि जेवण कसे घ्यायचे हे मला माहीतच नव्हते. मी पटकन जवळच्या स्टॉलमधून जेवण आणायचे आणि बाथरूममध्ये गुपचूप खात असल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
प्रियांका चोप्रा लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली आणि सध्या ती हॉलिवूडमध्ये काम करते आहे. अचानक तिने तिथे स्थायिक होण्याचा आणि हॉलिवूडमध्ये काम करण्याचा घेतलेला निर्णय तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होता. पण यामागचे कारण मध्यंतरी तिने स्पष्ट केले होते. बॉलिवूडमधील राजकारण, कंपूशाही अशा वेगवेगळ्या गोष्टींना कंटाळून तिने हॉलिवूडमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते.