संजय घावरे
मुंबई : इंग्रजी आणि हिंदी सिनेसृष्टीप्रमाणे मराठीतही सिक्वेल्सचा ट्रेंड अलिकडच्या काळात चांगलाच रुजला आहे. बॉक्स ऑफिसवर पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर बऱ्याच निर्मात्यांनी सिक्वेल बनवण्याची घोषणा केली होती. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण चित्रपट या महिन्यातील अखेरच्या आठवड्यात आणि ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'टाईमपास ३', 'दे धक्का २', 'टकाटक २', 'दगडी चाळ २' आणि 'बॉईज ३' असे एकूण पाच मराठी चित्रपटांचे सिक्वेल आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. 'टाईमपास' आणि 'टाईमपास २'च्या यशानंतर दिग्दर्शक रवी जाधवनं बनवलेला 'टाईमपास ३' हा चित्रपट २४ जुलै रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळेसह बरेच मराठी कलाकार आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ ऑगस्टला दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकरांचा बहुचर्चित 'दे धक्का २' रिलीज होणार आहे. लंडनमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, मेधा मांजरेकर आदी कलाकार आहेत. १८ ऑगस्टला चक्क दोन सिक्वेल्समध्ये टक्कर होणार आहे. या दिवशी दिग्दर्शक चंद्रकांत कणसेचा 'दगडी चाळ २' आणि दिग्दर्शक मिलिंद कवडेचा 'टकाटक २' रिलीज होणार आहे. कोरोनापूर्वी २०१९ मध्ये पहिल्या सहा महिन्यातील हिट चित्रपटांचा तुटवडा 'टकाटक'ने भरून काढला होता. त्यानंतर 'टकाटक २'ची घोषणा करण्यात आली होती. यात प्रथमेश परब, अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, स्वप्नील राजेशिर्के आदी कलाकार आहेत. 'दगडी चाळ २'मध्ये पुन्हा अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळेल. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी गोपाळकाला असल्याने हे दोन्ही चित्रपट गुरुवारीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सातत्यानं मराठी सिनेमाचा सिक्वेल रिलीज होणार आहे. १६ सप्टेंबर रोजी दिग्दर्शक विशाल देवरुखकरचा 'बॉईज ३' प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे यांची धमाल पहायला मिळेल. गाजलेल्या चित्रपटांचे सिक्वेल्स प्रदर्शित होत असल्याने सिनेसृष्टीत उत्साहाचे वातावरण असले तरी दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होतात तेव्हा दोघांचेही नुकसान झाल्याचे आजवर सर्वांनी पाहिले आहे.
गणेश गारगोटे (माध्यम समन्वयक, मीडिया वन)मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या सकारात्मक वातावरण आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांdh मिळालेल्या यशानंतर आता मराठी सिनेमांचे सिक्वेल्स पहायला मिळाणार असल्याने रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रसिकांची पोचपावती मिळालेल्या मराठी चित्रपटांच्या पुढील भागांनाही प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद देतील असे निर्मात्यांसह दिग्दर्शक-कलाकारांनाही वाटते. यंदा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या चित्रपटांनी सिक्वेल्ससाठी योग्य वातावरणनिर्मिती केल्याने हे चित्रपटही यशाची गणितं सोडवण्यात नक्कीच यशस्वी होतील अशी आशा वाटते.