भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या टी २० सामन्यातील एक सामना मंगळवारी(३० जुलै) खेळवला गेला. या सामन्यात भारताने विजय मिळवत श्रीलंकेचा तोंडचा घास पळवला. श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या काही षटकांमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या. या सामन्यात रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादवची खेळी निर्णायक ठरली. दोघांनी दोन षटकांत चार बळी घेत सामना फिरवला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना म्हणजे एखाद्या चित्रपटातील हास्यास्पद कथाच म्हणावी लागेल. या सामन्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकरही भारावून गेला आहे.
चिन्मयने क्रिकेटर सूर्यकुमार यादवसाठी पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडियावरुन चिन्मयने सूर्यकुमार यादवचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने पोस्ट लिहिली आहे. "तू भविष्यात एक उत्कृष्ट कर्णधार होऊ शकतोस, याची काल आम्हाला एक झलक दाखवलीस", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने सगळ्यांनाच अचंबित केलं आहे.
कालच्या सामन्यात भारताने श्रीलंकेपुढे १३८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंका सहज सामना जिंकेल असे अपेक्षित होतं. मात्र भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेला पराभूत केलं. श्रीलंकेचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १३७ धावा करू शकल्याने सामना अनिर्णित संपला. मग सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवून ३-० ने मालिका जिंकली. पल्लेकले येथील आंतरराष्ट्रीय मैदानात अखेरचा सामना झाला.
भारताचा संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, खलील अहमद, मोहम्मद सिराज.