भारतात आज सगळीकडे 74वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून सगळीकडे उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. बॉलिवूडदेखील स्वातंत्र्यदिन साजरा करतो. हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत. हे चित्रपट पाहून तुम्ही स्वातंत्र्यदिन साजरा करू शकता.
मिशन मंगल हा चित्रपट मल्टीस्टारर असून या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी व शर्मन जोशी हे कलाकार आहेत. इस्रोचे अविश्वसनीय यश पाहून नक्कीच तुम्हाला देशाचा अभिमान वाटेल.
मागील वर्षी सुपरहिट ठरलेला चित्रपट 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' उरीमध्ये भारतीय सुरक्षादलांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्टाईक केलं होतं, त्यावर आधारीत आहे. या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून त्याच्या दमदार परफॉर्मन्ससाठी त्याला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित द लीजेंड ऑफ भगत सिंग चित्रपट शहीद भगत सिंग यांच्यावर बनलेला सर्वात चांगला चित्रपट मानला जातो. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला २००३ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटातून भगत सिंग यांचे देशावरील प्रेम, त्याग व शौर्य पाहून प्रेरणा मिळते.