'वन्यजीव चित्रपट निर्मितीसाठी भारत अतिशय योग्य'

By संजय घावरे | Published: June 18, 2024 07:45 PM2024-06-18T19:45:11+5:302024-06-18T19:47:34+5:30

'मिफ'च्या मास्टरक्लासमध्ये वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय यांचे प्रतिपादन

India is well suited for wildlife filmmaking Says Cinematography Alphonse Roy | 'वन्यजीव चित्रपट निर्मितीसाठी भारत अतिशय योग्य'

'वन्यजीव चित्रपट निर्मितीसाठी भारत अतिशय योग्य'

मुंबई  - जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे वन्यजीव चित्रपट निर्मिती संपूर्णपणे शिकता येईल. यासाठी वन्य जीवनाबद्दल पराकोटीची आवड गरजेची असून, अत्यंत समृध्द जैवविविधता असलेला भारत यासाठी अत्यंत योग्य जागा आहे. प्राणी, निसर्ग आणि त्यांच्या शांततेला चित्रिकरणापेक्षा अधिक प्राधान्य द्यायला हवे असे वन्यजीव चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अल्फोन्स रॉय म्हणाले. अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'वन्यजीवनाचा शोध : भारतीय वन्यजीवन माहितीपट आणि संवर्धन प्रयत्न' या विषयावर आयोजित मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते. 

मुंबईमध्ये सध्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. यातील मास्टरक्लासमध्ये भारतीय वन्यजीवन आणि त्याच्या संवर्धनाच्या उपक्रमाशी संबंधित माहितीपटांच्या निर्मितीसाठीच्या जटील प्रक्रियेबाबत या सत्रात विचारमंथन करण्यात आले. अल्फोन्स रॉय म्हणाले की, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे निर्माते पक्षी अथवा इतर लहान प्रजातींपेक्षा वाघ, सिंह अथवा निळा देवमासा यांच्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये अधिक रुची घेतात. वन्यजीवनावर आधारित चित्रपटांच्या बाबतीत त्या त्या प्राण्याविषयीच्या आकर्षणावर अवलंबून असलेली एक विशिष्ट श्रेणी व्यवस्था अस्तित्वात आहे. या क्षेत्रात ध्यासाला सर्वाधिक महत्त्व आहे हे लक्षात ठेवण्याचा सल्ला त्यांनी उदयोन्मुख वन्यजीव चित्रपट निर्मात्यांना दिला.

रॉय नैतिक चित्रपट निर्मितीच्या महत्त्वावर अधिक भर दिला. या क्षेत्रात चित्रिकरणापेक्षा, विषय आणि निसर्ग यांना नेहमीच अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे ही बाब त्यांनी ठळकपणे मांडली. आपण तिथे असल्याची प्राण्यांना जाणीव होता कामा नये असे सांगून विचलित न झालेल्या प्राण्यांची दृश्ये मिळवायची असे त्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवविषयक अहोरात्र सुरु असणाऱ्या वाहिन्यांच्या या युगात, कोणत्याही परिस्थितीत वन्यजीवनाला त्रास होऊ नये या दंडकाची पिछेहाट होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

वन्यजीवनाशी संबंधित चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील उत्क्रांतीविषयी चर्चा करताना रॉय यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव मान्य केला. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये वन्यजीवनाचे क्षण टिपणे सोपे झाल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी आजच्या काळात व्यावसायिक वन्यजीव चित्रपट निर्मितीला लागणाऱ्या मोठ्या खर्चाकडे देखील दिशानिर्देश केला. वाढलेली मानवी लोकसंख्या आणि जमिनीच्या आकारमानाच्या मर्यादांमुळे वारंवार मनुष्य-प्राणी संघर्ष होत आहेत याची दखल घेत भारतातील वन्यजीव संवर्धनाच्या सद्यस्थितीबद्दल रॉय यांनी चिंता व्यक्त केली.  

विद्यार्थ्यांना निसर्गात रममाण होण्यासाठी प्रोत्साहित करत रॉय यांनी त्यांना निसर्ग क्लब आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी किंवा मद्रास नॅचरल सायन्स सोसायटीसारख्या संस्थांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी वन्य  हस्तकला शिकण्याचे आणि आदिवासींच्या ज्ञानातून प्रेरणा घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.

तमिळनाडूच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी  संस्थेचे माजी विद्यार्थी असलेल्या रॉय यांच्या छायाचित्रण निर्देशक म्हणून उल्लेखनीय कामांमध्ये ‘गौर हरी दास्तान’, ‘लाइफ इज गुड’ आणि ‘उरुमी’ आदी गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. रॉय यांच्या सिनेमॅटिक दृष्टीमुळे त्यांना १९९५ मध्ये 'तिबेट द एंड ऑफ टाईम'साठी प्राइम टाइम एमी पुरस्कार आणि २००८ मध्ये 'टायगर किल'साठी ह्यूगो टेलिव्हिजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: India is well suited for wildlife filmmaking Says Cinematography Alphonse Roy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई