Join us

दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज..; T20 WC जिंकताच क्षितीजची राहुल द्रविडसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 11:30 AM

मराठमोळा लेखक - दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने भारताने T20 WC जिंकताच सोशल मीडियावर राहुल द्रविडसाठी खास पोस्ट लिहिली आहे. (t20 wc)

काल १४० कोटी भारतीयांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. भारताने T20 वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता शिगेला होती. कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण भारताने उत्कृष्ट बॅटींग, गोलंदाजी आणि फिल्डींगच्या जोरावर T20 वर्ल्डकपवर स्वतःचं नाव कोरलं. T20 वर्ल्डकपवर जिंकल्यावर भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशातच मराठमोळा लेखक - दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने T20 वर्ल्डकपवर भारताने नाव कोरल्यावर भारतीय संघाचा कोच राहुल द्रविडसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

क्षितीज पटवर्धन द्रविडबद्दल काय म्हणाला?

क्षितीजने द्रविडचा एक फोटो कोलाज केलाय. ज्यात एका फोटोत द्रविडच्या डोळ्यात पाणी तर दुसऱ्या फोटोत काल भारताने T20 वर्ल्डकपवर द्रविडच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येतोय. हा फोटो शेअर करत क्षितीज लिहितो, "व्यथेची दंतकथा व्हायला सर्वस्व द्यावं लागतं. राहुल द्रविड. काळाच्या परीक्षा संपल्या, पण माणसाचा अभ्यास नाही संपला. संधी बघता बघता सुटल्या पण माणसाची चिकाटी नाही सुटली. भूमिका वेळोवेळी बदलल्या पण माणसाची निष्ठा नाही बदलली. दोन दशकं भिंत म्हणून राहिला अन् आज शिखर म्हणून निवृत्त झाला. राहुल द्रविड. आदर्शांच्या छोट्याश्या यादीत तुझं नाव कायम वर असेल. कायम."

आणि भारताने T20 विश्वचषकावर स्वतःचं नाव कोरलं

टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आनंद व्यक्त केला. तसेच एक खेळाडू म्हणून कधी ट्रॉफी जिंकता आली नाही ही खदखद देखील बोलून दाखवली. भारताच्या क्रिकेट संघाने १३ वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवत शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने १३ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली, तर २००७ नंतर भारताने प्रथमच ट्वेंटी-२० विश्वचषक उंचावला.

या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटला अर्थात ट्वेंटी-२० क्रिकेटला रामराम केले. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवून रोहितसेनेने विजय साकारला. जेतेपद पटकावल्यानंतर सर्वच भारतीय खेळाडू भावूक झाल्याचे दिसले. 

 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024टी-20 क्रिकेटराहुल द्रविडभारत