छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो 'बिग बॉस'ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. एक सीझन संपला की दुसऱ्या सीझनची प्रेक्षक नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहतात. कन्नड, तेलुगू, तमिळ, मराठी, बांग्ला, मल्याळम अशा भाषांमध्येही हा शो होतो. सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या सर्वाधिक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. सलमान प्रमाणे त्या-त्या भाषिक चित्रपटांमधील सुपरस्टार्स बिग बॉसच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. मराठीत गेल्या वर्षी पार पडलेल्या पाचव्या सीझनचं सुत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखनं केलं होतं. आता समोर आलेल्या माहितीनुसार बांगला 'बिग बॉस'चं सुत्रसंचालन सौरव गांगुली (Sourav Ganguly) करणार, अशी चर्चा रंगली आहे.
क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी ओळखला जाणारा क्रिकेटपटू आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही 'दादागिरी' करताना पाहायला मिळणार आहे. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, क्रिकेटपटू सौरव गांगुली हा 'बिग बॉस बांगला'चे सूत्रसंचालन (Sourav Ganguly To Host Bigg Boss Bangla) करणार आहे. दोन नॉन फिक्शन कार्यक्रमासाठी सौरव गांगुलीनं स्टार जलसा यांच्यासोबत करार केला आहे. सौरव हा 'बिग बॉस बांगला' आणि आणखी एका क्विज शोचं होस्टिंग करणार आहे. यासाठी सौरवला १२५ कोटींचं मानधन मिळणार असल्याचे वृत्त आहे. सौरव गांगुली आणि स्टार जलसा यांच्यात चार वर्षांसाठी हा करार झाला आहे. या क्विझ शोचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही. दोन्ही शो जुलै २०२५ पासून सुरू होतील असे वृत्त आहे
स्टार जलशाशी जोडल्या गेल्यानंतर सौरव गांगुलीनं आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, "टीव्हीने मला लोकांशी जोडण्याचा एक खास मार्ग दिला आहे. नॉन-फिक्शन शोद्वारे कथाकथनाचा एक नवीन अध्याय सुरू करत आहोत. त्यामुळे मनोरंजन आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टींचा आनंद घेणारे कार्यक्रम करण्यास मी खूपच उत्सुक आहे. माझ्यासाठी ही एक नवीन इनिंग आहे आणि मी खेळाप्रमाणे त्याच जोशाने ती खेळण्यास तयार आहे".
'बिग बॉस'विषयी...
'बिग बॉस' या रिॲलिटी शोमध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन घरामध्ये ठराविक दिवसांसाठी राहतात. कॅमेऱ्याद्वारे स्पर्धकांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं जातं. त्यांना दर आठवड्याला काही टास्क दिले जातात. घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्यांचे चाहते ऑनलाइन पद्धतीने वोट करत असतात. सर्वात कमी वोट्स असलेला स्पर्धक या कार्यक्रमातून बाहेर पडतो. शेवटी उरलेल्या दोन स्पर्धकांपैकी ज्याला जास्त मते पडतात, तो स्पर्धक या शोचा विजेता ठरतो आणि त्याला ठराविक रक्कम व अन्य गोष्टी बक्षीस म्हणून मिळतात.