मीटू मोहिमेमुळे अनु मलिक यांना 'इंडियन आयडॉल 10'च्या परीक्षकाच्या पद सोडावे लागले. आता त्यांच्या जागी सलीम-सुलेमान ही संगीतकार जोडी पाहायला मिळेल.
मीटू मोहिमे अंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर संगीतकार अनू मलिक यांची अखेर सोनी वाहिनीने 'इंडियन आयडॉल' या गाण्याच्या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदावरून हकालपट्टी केली आहे. अनु मलिक यांनी अधिकृत स्टेटमेंट प्रसिद्ध केले त्यात ते म्हणाले की, सध्या मी शोवर माझे लक्ष केंद्रीत करू शकत नाही आहे. त्यामुळे मी हा शो सोडतो आहे. अनु मलिकने हा शो सोडल्यानंतर त्यांची जागी कोण परीक्षक येणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. सोनी टीव्हीकडून सांगण्यात आले होते की, प्रत्येक आठवड्यात परीक्षक विशाल दादलानी व नेहा कक्कर यांच्यासोबत नवीन गेस्ट परीक्षक असेल.मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार 'इंडियन आयडॉल 10'मध्ये अनु मलिकच्या जागी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान पाहायला मिळणार आहेत. सलीम सुलेमान विशाल दादलानी व नेहा कक्कर यांच्यासोबत एक आठवडा या शोचे परीक्षण करणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात दुसरे परीक्षक पाहायला मिळतील.अनू मलिकवर श्वेता पंडित, सोना मोहपात्रा या दोन गायिकांसह चार महिलांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले. मलिक यांच्या घरी गेले असता, सोफ्यावर बाजूला येऊन बसले आणि त्यांनी माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. मी पळण्याचा प्रयत्न केला, पण मला ते शक्य झाले नाही. नशिबाने तेव्हा कोणीतरी दार वाजवले, पण या प्रसंगाबाबत कोणाला काही न सांगण्याची धमकी त्यांनी मला दिली, असा एका महिलेचा आरोप आहे. दुसरा आरोप मलिकवर सोनी वाहिनीवरील रिअॅलिटी शोच्या माजी स्पर्धकाने केला. या आरोपांची गंभीर दखल घेत, वाहिनीने मलिक यांची परीक्षक पदावरून हकालपट्टी केली.