कधी रस्त्यावर लोकांचे बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्तानी याला अखेर त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. इंडियन आयडल 11 ची ट्रॉफी जिंकत सनीने एक वेगळा इतिहास रचला. काल इंडियन आयडल 11 चा विजेता म्हणून सनी हिंदुस्तानीचे नाव पुकारण्यात आले आणि सनीला भावना रोखता आल्या नाहीत. आईने त्याला हृदयाशी कवटाळले. महाराष्ट्रातील रोहित राऊत हा या उपविजेता ठरला. इंडियन आयडल 11 मध्ये येण्यापूर्वी सनी बूटपॉलिश करून मिळणा-या पैशातून उपजीविका चालवत होता. इंडियन आयडल 11ने त्याच्या नशीबाला कलाटणी दिली. पंजाबच्या बठिंडा येथील अमरपुरा भागात राहणा-या सनीच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरही तो लोकप्रिय झाला आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचे विजेतेपद पटकावले. सध्या त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सनी हा पंजाबच्या भटिंडाचा राहणारा आहे. संगीताचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता फक्त गाणं ऐकून शिकलेल्या सनीची तुलना नुसरत फतेह अली खां यांच्याशी केली गेली. इंडियन आयडल 11 च्या सर्व जजेसला त्याने आपल्या आवाजाने प्रभावित केले.
विजेतेपद पटकावणा-या सनी हिंदुस्थानीला रोख 25 लाख, इंडियन आयडलच्या ट्रॉफीने गौरविण्यात आले. याचवेळी भुषण कुमार यांच्या टी-सीरीजच्या आगामी सिनेमात गाण्याचे कॉन्ट्रॅक्टही त्याला मिळाली. टाटा कंपनीची नवी एल्ट्रॉज कारही सनी हिंदुस्थानीला मिळाली. दुस-या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले.