सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन १२ मधील आगामी वीकेंड हा ‘किशोर कुमार १०० साँग्स स्पेशल’ भाग असणार आहे. या अत्यंत गाजलेल्या सिंगिंग रियालिटी शोचा मंच यावेळी सुशोभित करणार आहे लोकप्रिय गायक अमित कुमार. महान गायक किशोर कुमार यांना वाहिलेली सुरेल श्रद्धांजली म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे. परीक्षक नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि अन्नू मलिक प्रेमाने या पाहुण्या गायकाचे स्वागत करतील. स्पर्धकांनी सादर केलेली सुमधुर गाणी सगळ्या श्रोत्यांना संगीताच्या सुवर्णकाळात घेऊन जातील.
‘मेरे नैना सावन भादो’, ‘अरे यार मेरी तुम भी हो गझब’ आणि ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे’ या गाण्यांवरील अंजली गायकवाडच्या अप्रतिम परफॉर्मन्सने सेटवर उपस्थित सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. प्रमुख अतिथी अमित कुमार आणि तिन्ही परीक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. त्याच वेळी हिमेश रेशमियाने एका गाण्यामागची कथा सांगितली, जे गाणे किशोर कुमार यांनी त्याच्या सुरुवातीच्या काळात म्हटले होते.
अंजलीच्या आवाजाचे कौतुक करत अमित कुमार म्हणाला, “ज्यावेळी ही गाणी किशोर कुमार यांनी म्हटली, त्या वेळी त्यांनी गाण्याचे प्रशिक्षण घेतलेले नव्हते. आज तुझी ही प्रतिभा पाहून हे लक्षात येत आहे की, तुझ्या वडिलांनी तुला सुर आणि तालाची उत्तम समज दिली आहे आणि तुझा आवाज देखील आकर्षक आहे.”पुढे हिमेश रेशमिया म्हणाला, “त्या वेळेस माझे वडील विपिन रेशमिया यांनी किशोरदांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यात शास्त्रीय संगीताची छटा होती. आजही ते गाणे माझ्याजवळ आहे, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते. पण हे माझे वचन आहे की, मी ते गाणे रिलीज करेन. कारण किशोरदा आणि लता दीदींनी म्हटलेले ते माझ्या वडिलांचे कंपोझिशन आहे.”
त्याने पुढे डबिंगच्या तालमीच्या वेळेसचा किस्सा सांगताना म्हटले, “लताजींनी अप्रतिम परफॉर्मन्स दिला आणि जेव्हा किशोरदांनी लताजींनी म्हटलेले गाणे ऐकले, तेव्हा त्यांनी तत्काळ सांगितले की, आता रेकॉर्डिंग कॅन्सल. कारण आता मीच पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही आवाजात गाणार आहे आणि पुढे ते म्हणाले, लताजींनी हे खूपच छान गाईले आहे पण मला याचा सराव करावा लागेल.” किशोरदा माझ्या वडिलांना बर्याचदा फोन करत असत. किशोरदांनी त्या गाण्याचा बराच सराव केला आणि मग ते रेकॉर्ड केले. हे लता आणि किशोर कुमार यांनी म्हटलेले गाणे मी नक्कीच रिलीज करीन, जे तेव्हा रिलीज होऊ शकले नव्हते.”