इंडियन आयडॉल १२ वरून सुरू असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आता या शोचा परीक्षक विशाल दादलानीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहते हैराण झाले आहेत. म्युझिक कंपोझर आणि गायक विशाल दादलानी आता इंडियन आयडॉल १२मध्ये दिसणार नाही. त्याने सांगितले की, इंडियन आयडॉल १२ मध्ये कमबॅक करणार नाही. विशाल दादलानी मागील तीन सीझनचे या शोचे परिक्षण करतो आहे. त्याच्यासोबत नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर शूटिंगलाही बंदी घालण्यात आली. त्यानंतर इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी शूटिंग दमणमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विशाल दादलानीसोबत नेहा कक्कर, हिमेश रेशमियाने शूटिंगसाठी दमणला जाण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मनोज मुंताशिर आणि अनु मलिक पहायला मिळत आहेत.