Join us

Karan Johar : कभी खुशी कभी गम अन् करिनाची ओव्हर ॲक्टिंग..., करण जोहरने सांगितला मजेशीर किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 6:50 PM

Karan Johar , Kareena Kapoor : करण जोहर व करिना कपूर किती चांगले मित्र आहेस, हे नव्यानं सांगायची गरज नाही. तिच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से करण जोहरकडे आहेत. अलीकडे इंडियन आयडल १३ च्या सेटवर करणने असाच एक मजेशीर किस्सा ऐकवला...

करण जोहरकरिना कपूर किती चांगले मित्र आहेस, हे नव्यानं सांगायची गरज नाही. बॉलिवूडच्या पार्ट्यांना बेबो, करण अशी सगळी गँग हजर असते. करणच्या चित्रपटात बेबोने कामही केलंय. साहजिकच तिच्याबद्दलचे एक ना अनेक किस्से करण जोहरकडे आहेत. अलीकडे इंडियन आयडल १३ च्या सेटवर करणने असाच एक मजेशीर किस्सा ऐकवला.

इंडियन आयडॉल १३ च्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे. या एपिसोडमध्ये करण जोहर करीना कपूर खानचा एक मनोरंजक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर करताना दिसेल. या मजेशीर क्षणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. "करण सर क्या आपके किसी सीन में किसी एक्टर ने कभी ओवर एक्टिंग की है?", असं इंडियन आयडॉल 13 चा होस्ट आदित्य नारायण करण जोहरला विचारतो. या प्रश्नाचं उत्तर देताना करण करिना कपूरचं नाव घेतो. सोबत 'कभी खुशी कभी गम'च्या सेटवरचा एक मजेशीर किस्साही शेअर करतो.

तो सांगतो, “कभी खुशी कभी गमच्या सेटवर आम्ही एक सीन करत होतो. या चित्रपटात शाहरुख खान 10 वर्षांनंतर त्याची आई जया बच्चनला भेटतो, असा सीन होता. या सीनमध्ये काजोल, करिना सगळ्यांनाच इमोशनल व्हायचं होतं. त्याआधी संपूर्ण चित्रपटात करिनाचे फनी सीन्स दिले होते. त्यामुळे आज इमोशनल सीन द्यायचा आहे, म्हटल्यावर करीना शूटिंगच्या आधी पहाटे माझ्याकडे आली.  आज एक इमोशनल सीन आहे ना?, असं तिने मला विचारलं. मी म्हटलं, हो. मग आज मला रडावं लागेल का? असा आणखी एक प्रश्न तिने मला केला. मी म्हटलं थोडं भावूक व्हायचं आहे, एवढंच.. यानंतर प्रत्यक्ष शूट सुरू झालं.  त्या शॉटमध्ये शाहरुख आणि जया एकमेकांना भेटतात आणि ते पाहून हृतिक इमोशनल होतो व वळतो. नेमक्या याचक्षणी करिनाला थोडं भावुक होत त्याला आधार देत त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा होता.   मी करीनाशी या सीनसाठी चर्चा केली होती. यानंतरही करीना मला वारंवार एकच प्रश्न विचारत होती. कदाचित ही जास्त कॅरेक्टरमध्ये गेलीये, असं मला वाटलं. शूट सुरू झालं आणि मी ॲक्शन म्हणताच  बॅकग्राउंडमध्ये संगीत वाजू लागलं. ठरल्याप्रमाणे मग हृतिक वळला आणि करिना...? ती वेड्यासारखी रडू लागली. तो माझ्यासाठी धक्का होता. करिना मोठमोठ्याने रडत होती आणि तिचं रडणं बघून हृतिक संतापला होता. बेबो, तुला काय झालं, इतकी का रडतेस? असं मी तिला विचारलं. यावर, तूच तर इमोशनल सीन करायला सांगितलास ना, असं ती मला म्हणाली. मी डोक्यावर हात मारून घेतला. हो, गं बाई मी सांगितलं, पण इतकं सांगितलं नव्हतं, असं म्हणून मी गप्प झालो. तिची ओव्हर ॲक्टिंग मिनिटभर सुरू होती. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत तसं काही प्रथमच पाहिलं होतं".

टॅग्स :करण जोहरकरिना कपूरइंडियन आयडॉल