Ranveer Alahabadia: समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये केलेल्या पालकांबद्दलच्या अश्लील विधानामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. याप्रकरणी रणवीर अलाहाबादियासह समय रैना आणि इतर काही जणांविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. एकीकडे रणवीरच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालेला असताना दुसरीकडे या शोमध्ये हजेरी लावलेल्या एका प्रेक्षकाचा व्हिडिओ समोर आला आहे.
इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये रणवीर जेव्हा आलेल्या स्पर्धकासोबत त्याच्या पालकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. तेव्हा नेमकं काय झालं, हे तिथे उपस्थित असणाऱ्या एका प्रेक्षकाने सांगितलं आहे. मोहित कुबानी असं या प्रेक्षकाचं नाव असून त्याने शोमध्ये काय घडलं? हे सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो म्हणतो, "मी तिथे उपस्थित होतो आणि मला माहीत आहे की नेमकं काय झालं. मी प्रेक्षकांमध्ये होतो. स्पर्धक असलेला तो मुलगा आला, काहीतरी बकवास गोष्टी बोलल्या गेल्या. त्यानंतर रणवीरने ते वक्तव्य केलं. पण, त्या वक्तव्यानंतर रणवीर ३-४ वेळा त्या स्पर्धकाला सॉरी तुला वाईट तर वाटलं नाही ना...असंही म्हणाला".
"सॉरी बोलून सगळं काही ठीक होत नाही हे मला माहीत आहे. पण, रणवीरने या गोष्टीची काळजी घेतली की तो स्पर्धक एक मुलगा आहे. त्यानंतरही काही वेळ त्यांच्यात संभाषण झालं. समयनेही त्याला तू ठीक आहेस ना असं विचारलं होतं. त्यानंतर त्या मुलाने शोदेखील जिंकला. त्यानंतरही रणवीरने त्याला मिठी मारून तू ठीक आहेस ना असं विचारलं. त्या जोकसाठी वाईट वाटलं असेल तर सॉरी, असंही रणवीर त्याला म्हणाला. त्यामुळे उगाचच द्वेष पसरवू नका, असं मला सांगायचं आहे", असंही तो व्हिडिओत पुढे म्हणत आहे.