Indias Got Latent: 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रणवीर अलाहाबादियाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या शोमध्ये आई-वडिलांच्या नात्यावर अश्लील जोक केल्याबद्दल पोलिसांनी त्याला चौकशीसाटी बोलावले होते, मात्र तो हजर झाला नाही. आता अचानक रणवीर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा फोन सातत्याने बंद येत आहे. शिवाय, गुरुवारी सायंकाळी मुंबई पोलीस रणवीरच्या घरी गेले, तेव्हा त्याच्या घराला कुलूप होते.
रणवीर अलाहाबादियासोबत शोचा होस्ट समय रैना, अपूर्व मखिजा, आशिष चंचलानी आणि 'इंडियाज गॉट लेटेंट' शोची टीमही कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, एकएक करत प्रत्येकाची खार पोलीस ठाण्यात चौकशी केली जात आहे. रणवीर अलाहाबादिया यालाही चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते, पण तो पोलिस ठाण्यात हजर झाला नाही. पोलिसांनी दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर 13 फेब्रुवारीला रणवीरने पोलिसांना त्याच्या घरी येऊन जबाब नोंदवण्याची विनंती केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला.
आता मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रणवीर अचानक गायब झाला आहे. पोलिस त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याचा फोन बंद येत आहे. पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले असता, त्याच्या घरालाही कुलूप आहे. त्याचे वकीलही त्याच्यापर्यंत पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. अशा परिस्थितीत रणवीर अचानक कुठे गेला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?रणवीर एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. दर महिन्याला तो लाखोंची कमाई करतो. रणवीरचे पॉडकास्ट चॅनल असून, त्याच्या चॅनलवर आतापर्यंत अनेक मोठे सेलिब्रिटी, राजकीय नेते, खेळाडू आले आहेत. पण आता सेलेब्स त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवत आहेत. रणवीरने यूट्यूबर समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये जज म्हणून भाग घेतला होता. हा एक डार्क कॉमेडी शो आहे. यात रणवीरने आई-वडिलांच्या नात्यावर केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे अडचणीत आला आहे.