दिग्दर्शक मधुर भांडारकर सध्या अगदी गुपचूपपणे एका चित्रपटावर काम करत आहेत. होय, हा चित्रपट आहे ‘इंदू सरकार’. ना या चित्रटाबद्दल कुठे चर्चा आहे, ना यातील कलाकारांबद्दल कुठले गॉसिप्स. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट येत्या २८ जुलैला रिलीज होतो आहे. आधी हा चित्रपट २१ जुलैला रिलीज होणार होता. पण आता ही तारीख आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. अर्थात यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘इंदू सरकार’चे प्रदर्शन लांबणीवर!
By admin | Published: May 31, 2017 5:08 AM