Join us

उद्योगांमुळेच होतोय कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास; शेती गेली, मासे गेले, पाणथळ जमिनीही उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 8:23 AM

भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतीची जागा कारखान्यांनी गिळंकृत केली. रसायनी परिसरात जिल्ह्यातील पहिलाच औद्योगिक प्रकल्प निर्माण झाला. नंतर महाड, रोहा, अलिबाग, पेण, पाली येथेही प्रकल्प सुरू झाले.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड/रत्नागिरी : कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा या हेतूने उद्योगांना चालना देण्यात आली. मात्र, याच उद्योगांतून होणारे प्रदूषण कोकणासाठी घातक ठरू लागले आहे. कोकणातली पारंपरिक मासेमारी आणि भातशेती धोक्यात आली आहे. विकासाच्या नावावर निसर्गालाच थेट आव्हान देण्यात येत असल्याने अन्न साखळी धोक्यात आली आहे.

भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतीची जागा कारखान्यांनी गिळंकृत केली. रसायनी परिसरात जिल्ह्यातील पहिलाच औद्योगिक प्रकल्प निर्माण झाला. नंतर महाड, रोहा, अलिबाग, पेण, पाली येथेही प्रकल्प सुरू झाले. या उद्योगांनी नागरिकांना रोजगार दिला, पण त्याचबरोबर चौपट प्रदूषणही दिले. रोहा, पाताळगंगा, महाड येथे औद्योगिक वसाहती आहेत. मोठमोठे कारखाने आहेत. हे कारखाने सतत धूर ओकताना दिसतात. 

कारखान्यांमुळे जल, वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मानवी जीवनाबरोबरच, पशु, पक्षी एकूणच पर्यावरणावर होत आहे. प्रदूषणामुळे थेट अन्न साखळीवर परिणाम होत असल्याने ते अत्यंत धोकादायक आहे.         - डॉ. अनिल पाटील

विकास हा सर्वसमावेशक असला पाहिजे. प्रदूषणाच्या बाबतीमध्ये कंपन्यांसह पर्यावरणीय विभागाने आपले उत्तरदायित्व ओळखले पाहिजे. पर्यावरण टिकले तरच आपण टिकणार आहोत.     - डॉ. सचिन पाटील, अध्यक्ष,     रिसोर्स सेंटर फॉर ह्युमन डेव्हलपमेंट

तिवरांची वने नामशेष   कारखान्यांच्या सांडपाण्याने शिंपल्या, निवटे, कालव असे मासे धोक्यात आले. पाणथळ जमिनी हळूहळू कारखान्यांसाठी, गृहनिर्माण प्रकल्पांसाठी, शहरे वसविण्यासाठी नष्ट झाल्या. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड, पेण, पनवेल येथील पाणथळ जमिनींचे अस्तित्व विकासाच्या उदरात गडप झाले. माशांच्या प्रजननासाठी तिवरांची वने उपयुक्त असतात. मात्र, हीच तिवरांची वने भराव टाकून, रसायने टाकून उद्योगांनी गिळंकृत केली. 

दाभोळ खाडीला प्रदूषणाचा शापn शहरातून खाडीत सोडण्यात येणारे सांडपाणी, कारखान्यांचे रासायनिक पाणी आदींमुळे दाभोळ खाडीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. n खाडीतील माशांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा थेट परिणाम खाडीतील जैवविविधतेवर होत आहे. n खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण आणि गुहागर तालुक्‍यांमधील नद्या, उपनद्यांचे प्रवाह दाभोळ खाडीला मिळतात. n लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार छुप्या मार्गाने रासायनिक पाणी दाभोळ खाडीत सोडतात. त्यामुळे खाडी किनारी असलेल्या ८६ गावांमधील ग्रामस्थांचा पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय संकटात आला आहे. 

टॅग्स :प्रदूषण