Join us

'रॉकी भाई'ला कॉपी करणं पडलं महागात, १५ वर्षीय फॅनने केलं असं काही थेट हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 4:41 PM

मुलाच्या कुटुंबियांनी त्याला हैद्राबादच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. जिथे समजलं की, मुलाची ही अवस्था सिगारेट ओढल्याने झाली आहे.

साऊथचा सुपरहिट सिनेमा 'केजीएफ चॅप्टर २' (KGF Chapter 2) मधील रॉकी भाईच्या स्टाइलची क्रेझ तरूणांमध्ये किती आहे हे काही सांगायला नको. तरूण त्याला कॉपी करत आहेत. पण रॉकी भाईला कॉपी करणं एका १५ वर्षीय मुलाला चांगलंच महागात पडलं. रॉकी भाईच्या भूमिकेने इन्स्पायर होत या मुलाने इतक्या सिगारेट ओढल्या की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. ही घटना हैद्राबादच्या (Hyderabad) बंजाराहिल्समधील आहे.

असं सांगितलं जात आहे की, या मुलाने पहिल्यांदा सिगारेट ओढली आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात. खूप जास्त सिगारेट ओढल्याने त्याला आधी कफाची समस्या झाली. ज्यानंतर त्याला गळ्यात वेदना सुरू झाल्या होत्या.

मुलाच्या कुटुंबियांनी त्याला हैद्राबादच्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. जिथे समजलं की, मुलाची ही अवस्था सिगारेट ओढल्याने झाली आहे. सेंचुरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, KGF Chapter 2 रिलीज झाल्यावर दुसऱ्या आठवड्यात या मुलाने सिनेमा पाहिला. त्याने दोन दिवसात तीन वेळा सिनेमा पाहिला. यादरम्यान तो सतत सिगारेट ओढत होता.

असं सांगितलं जात आहे की, KGF 2 मध्ये रॉकी भाईच्या भूमिकेने तो इतका प्रभावित झाला होता की, त्याने त्याच्यासारखंच बनण्यासाठी हे असं केलं. मात्र, आजारी पडल्यावर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सांगितलं की, उपाचारानंतर मुलाची तब्येत ठीक आहे. त्याला गेल्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

सेंचुरी हॉस्पिटलचे डॉक्टर रोहित रेड्डू यांनी सांगितलं की, 'लोक नेहमीच सिनेमाती हिरोंच्या भूमिकांनी प्रभावित होतात. मग त्यांच्यासारखं बनण्यासाठी ते त्यांना कॉपी करू लागतात. पण अनेकदा असं करणं त्यांना महागात पडतं. दिग्दर्शकांनीही अशा गोष्टी दाखवू नये ज्याचा प्रभाव लोकांवर पडतो. जसे की सिनेमात सिगारेट ओढणं आणि तंबाखू खाणं दाखवणं बॅन केलं पाहिजे'.

ते म्हणाले की, 'बालपणी किंवा किशोरावस्थेत सिगारेट ओढल्याने तरूणांमध्ये अनेक प्रकारच्या गंभीर समस्या होतात. जसे की, श्वासासंबंधी, फुफ्फुसासंबंधी समस्या होतात. तसेच स्टॅमिनाही कमी होतो. धुम्रपानाची सवय सोडणं फार अवघड आहे. भारतात ८७ टक्के लोकांनी १८ वया सिगारेट ओढणं सुरू केलं आहे. ९५  टक्के लोकांनी २१ वयात स्मोकिंग सुरू केलं'.

टॅग्स :केजीएफजरा हटके