Join us  

“ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते...”, इन्स्टा स्टार Sonali Guravसोबत घडला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 3:23 PM

Sonali Gurav : सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली गुरवबरोबर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नुकतंच तिने या घडलेल्या प्रकाराबद्दल पोस्ट शेअर केली आहे...

सोशल मीडियावर रिल स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली गुरवबरोबर (Sonali Gurav) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इन्स्टा क्वीन सोनालीचा चेहरा मॉर्फ करून कुणीतरी तिचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सोनालीने याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. शिवाय या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट लिहून सविस्तर खुलासाही केला आहे. पोस्टसोबत एफआयआरची कॉपीची ही तिने जोडली आहे.सोनाली गुरव चांगलीच इन्स्ट्रा क्वीन म्हणून ओळखली जाते. तरूणाईत तिची प्रचंड क्रेझ आहे. सोनालीचे रील्स, व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. मात्र रविवारी तिने एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला.

सोनालीची पोस्ट...काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एखाद्या मुलीला ज्या गोष्टीचा नुसता विचारच असह्य होईल, नेमकी ती घटना माझ्या आयुष्यात घडली. काही मित्रांचा फोन आला कि एक अश्लील मॉर्फ व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. पायाखालची जमीन सरकली. पटकन सगळं सोडून कुठेतरी निघुन जावसं वाटलं. वाईट वाईट विचार येऊ लागले. ही घटना झाल्यापासून सतत माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या समोर यायचा. कौतुकाने बघणाऱ्या नजरा हिणवू लागल्या. सगळं काही छान सुरु असताना एखादं वादळ येऊन सगळं उद्धवस्त करून जातं. अगदी तसच वाटलं. आणि सगळ्यात जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा मला अश्लील मेसेज, इमेल्स आणि कमेंट्स येऊ लागल्या. लोकांना चर्चेला, मजा मारायला नवीन विषय मिळाला. खरंच एवढा वेळ आहे लोकांकडे? ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते आणि मग तेव्हा आपण असेच react करणार आहोत का? याची जाणीव कशी नाही होत. काही दिवस घाबरत कसेबसे दिवस ढकलू लागले पण नंतर घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणीनी मानसिक बळ दिलं  आणि मी पोलीस स्टेशन गाठलं. कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कधीच चढू नये असं मला नेहमी वाटतं. पण त्याउलट पोलिसात गेल्या गेल्या पोलिसांनी मला सहकार्य केलं आणि लगेच हालचाली सुरु झाल्या.

पोलीस झपाट्याने हे कृत्य करणाऱ्यांना आणि ते पसरवायला मदत करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. मला पोलीस आणि आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. फक्त खंत हीच आहे की आपला समाज एवढा विकृत कसा काय झाला? कुठून येते ही विकृती. १६-१७ वयाची लहान लहान पोरं देखील अश्लील केमेंट मेसेज करतात तेव्हा चीड येते. स्वतःच्याच समाजात वावरण्याची भीती वाटते. पण आता ठरवलं आहे मी जशी ही घटना झाल्यानंतरही माझ्या चाहत्यांचं, हितचिंतकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही त्यापेक्षा दुपटीने मेहनत करून तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करत राहीन. लवकरच अश्लीलता नसलेल्या, जज न करणाऱ्या समाजात मी आणि माझ्यासारख्या अनेक मुली बागडतील हीच स्वामींचरणी प्रार्थना....  

टॅग्स :सेलिब्रिटीइन्स्टाग्राम