जीवघेण्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. जगभरात 3 हजारांवर बळी घेणा-या या व्हायरसने भारतातही शिरकाव केल्याने देशभर भीतीचे सावट आहे. कोरोना व्हायरसचा धोका बघता जगभरातील अनेक महत्त्वाचे इव्हेंट व आयोजन रद्द करण्यात आले आहे. आता ‘आयफा 2020’ हा बॉलिवूडचा सर्वात मोठा अवार्ड शो सुद्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे.यावेळी मध्यप्रदेशात इंदूर येथे मार्चच्या अखेरिस हा भव्यदिव्य सोहळा रंगणार होता. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. पण कोरोना व्हायरसचा धोका बघता आयफाने हे सोहळ्याचे आयोजन पुढे ढकलले आहे. ऑफिशिअल स्टेटमेंट जारी करत आयफा कमेटीने ही माहिती दिली.
‘कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता आयफा चाहत्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी जनरल कमेटीने आयफा 2020चे आयोजन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फिल्म इंडस्ट्रीतील लोक आणि मध्यप्रदेश सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,’असे या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.
आता हा सोहळा कधी होईल, हे अनिश्चित आहे. सोहळ्याच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत कार्तिक आर्यन, कतरीना कैफ व दिया मिर्झायांनी आयफा 2020 बद्दल पत्रकार परिषद घेतली होती.नुकतीच आयफा 2020 ची नामांकने जाहीर झाली होती. या सोहळ्यासाठी आलिया भट व रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ या सिनेमाला 14 नामांकने मिळाली आहेत. पाठोपाठ शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाला 8 नामांकने तर आयुषमान खुराणाच्या ‘आर्टिकल 15’ या सिनेमाला 7 नामांकने मिळाली आहेत.