12 मिशा, तो सीन आणि मला झालेला भास..., ‘पावनखिंड’च्या सेटवरचा अजय पुरकरांचा थरारक किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 05:58 PM2022-02-21T17:58:09+5:302022-02-21T18:00:30+5:30
Pawankhind : ‘पावनखिंड’ या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांचे संवाद ऐकले की अंगावर काटा येतो. बाजीप्रभूंची ही भूमिका साकारलीये ती अभिनेते अजय पुरकर यांनी. कोण आहेत अजय पुरकर?
या दरडीच्या छाताडावर पाय रोऊन उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा. मी तुम्हाला वचन देतो, आज राजांना वाचवलंत, तर या घोडखिंडीच्या दगडादगडावर तुमची नावं कायमची कोरली जातील आणि तुम्हाला तुमचा हक्क, हक्कानं मागता येईल... ज्याचं नाव आहे, स्वराज्य! ’ हे ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांचे संवाद ऐकले की अंगावर काटा येतो. बाजीप्रभूंची ही भूमिका साकारलीये ती अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी.
चित्रपटातील अजय यांच्या भूमिकेचं सध्या प्रचंड कौतुक होतंय. त्यांनी ही भूमिका नुसती साकारली नाहीये तर ती अक्षरश: जगलीये. बाजीप्रभू साकारणं हे अजय यांच्यासाठी मोठ्ठ आव्हान होतं. ते त्यांनी अगदी लिलया पेललं. या पार्श्वभूमीवर अजय पुरकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली.
प्रचंड मेहनत आणि वर्कआऊट
बाजीप्रभूंसारखं आपण दिसतो की नाही, हा मला पडलेला पहिला प्रश्न होता. ही भूमिका जिवंत करायची तर प्रचंड शारीरिक मेहनत लागणार होती. तेव्हा मी एका मालिकेत मी काम करत होतो. डेलीसोपमध्ये काम करत असताना आपण वर्कआऊट कसं काय होणार? अशी चिंता मला होती. पण आतुशोष कुलकर्णी यांनी मला खूप सहकार्य केलं. पहाटे 5 ला ते जिम उघडायचे. माझं वर्कआऊट घ्यायचे आणि मला परत सोडून घ्यायचे. परत संध्याकाळी ते माझ्या सेवेत हजर असायचे. त्यांनी या काळात माझी खूप काळजी घेतली. तेव्हाचं बाजींचं वय हे 50 च्या पलीकडे होतं. त्यामुळे त्यांची तब्येत कशी असेल, हे सगळं एकप्रकारे डिझाईन केलं गेलं होतं, असं अजय पुरकर म्हणाले.
12 मिशा...
बाजीप्रभू पडद्यावर उभा करताना आम्ही मिशाचं 12 बदलल्या. त्यातून एक फायनल झाली आणि बाजींचा फायनल लूक तयार झाला. बाजीप्रभू गृहस्थ म्हणून कसे होते, हे दाखवण्यासाठी चित्रपटात दिग्पालने जेमतेम 2 मिनिटांचा त्यांच्या बायकोसोबतचा एक सीन केला. पण त्या 2 मिनिटांच्या सीनमधून बाजी गृहस्थ म्हणून कसे होते, हे त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहाचवलं. हे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून दिग्पालचं यश होतं. संपूर्ण चित्रपटाचं शूट करताना खिंडीतली लढाई हा या आमच्यासाठी अतिशय वेगळा अनुभव होता. 25 शॉवर वरती लागलेले आणि त्यात युद्ध दृश्य द्यायचं, हे सोप्प नव्हतं, असं अजय म्हणाले.
मी नुसता भिजत होतो...
मृत्यूचा सीक्वेन्स शूट करताना सकाळी 6 चा कॉलटाईम होता. सकाळी 8 वाजता मी भिजायला सुरूवात केली, संध्याकाळी 6 पर्यंत मी नुसता भिजत होतो. आम्हाला ना जेवणाचं भान होतं, ना ब्रेकचं. हा चित्रपटचं आमच्यासाठी खूपच वेगळा होता आणि तो करताना खूप मज्जा आली. खूप समाधान मिळालं, असं त्यांनी आवर्जुन सांगितलं.
तो सीन आणि मला झालेला भास...
खिंडीतला सीन आहे महाराज आणि बाजींचा. जिथे बाजी म्हणतात की, आम्ही इथे थांबतो,तुम्ही विशालगडाकडे जा. तो भयंकर इमोशनल सीन आहे. तो साकारणं माझ्यासाठी कठीण होतं. खिंडीतलं युद्ध आणि त्यांच्या मृत्यूचा अख्खा सीक्वेन्स अंतिम टप्प्यात आला होता. याचदरम्यान अचानक काही लोक माझ्याकडे बघत असल्याचा भास मला झाला होता. ऐरवी मला कधीही असे भास होत नाही. पण देव जाणो, त्यादिवशी हे घडलं. ती अनेक माणसं होती. ते नुसते बघत असल्याचं मला जाणवलं. एखादी कलाकृती घडतीये आणि ती तितक्याच तन्मतेनं घडवताहेत, म्हटल्यावर असं काहीतरी त्यावेळी घडलं होतं. हा भास होता की आणखी काही मला माहित नाही. पण त्यानंतर आणि बाजींच्या मृत्यूच्या सीक्वेन्सनंतर दोन तीन दिवस मी कुणाशी बोललोच नाही. कुणाला भेटलो आणि नंतर मी हळूहळू त्यातून बाहेर आलो, असा एक खास अनुभवही त्यांनी सांगितला.
कोण आहेत अजय पुरकर?
‘फर्जंद’ चित्रपटामध्ये अजय पुरकर यांनी मोत्याजी मामा ही भूमिका साकारली होती. ‘असंभव’ या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर वजलवारची भूमिका त्यांनी साकारली होती. या मालिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. ‘गुंतता हृदय’ या मालिकेत त२ डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसले होते. तू तिथं मी या मालिकेत त्यांनी मंजिरीच्या काकाची भूमिका साकारली होती.