Join us

‘बागी’ची धडाकेबाज सुरुवात

By admin | Published: May 03, 2016 1:17 AM

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या जोडीचा चित्रपट ‘बागी’तील ‘अ‍ॅक्शन’ने तरुणाईला आपलेसे केले आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच ३८ कोटींच्या आसपास व्यवसाय केला

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर या जोडीचा चित्रपट ‘बागी’तील ‘अ‍ॅक्शन’ने तरुणाईला आपलेसे केले आहे. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांतच ३८ कोटींच्या आसपास व्यवसाय केला आहे. बॉलीवूडमध्ये चांगले यश म्हणून याकडे पाहिले जात आहे. साजीद खान यांची निर्मिती व शब्बीर खान यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटींच्या आसपास आणि शनिवारी १०.७५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. बागीसाठी रविवार सुपर संडे ठरला आणि चित्रपटाने १५ कोटींच्या पुढे मजल मारली. चित्रपटातील जबरदस्त अ‍ॅक्शनखेरीज यापूर्वी प्रदर्शित चित्रपट न चालल्याचाही फायदा बागीला झाला. शिवाय शाळांना लागलेल्या सुट्यांचाही त्याच्या व्यवसायात वाटा आहे. कारण काहीही असो या चित्रपटाच्या यशामुळे निर्माता साजिद नाडियादवाला आणि चित्रपटाच्या चमूतील सदस्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले आहेत हे निश्चित. यापूर्वी प्रदर्शित चित्रपटांबाबत बोलायचे झाल्यास, रणदीप हुडाचा लाल रंग, आकाशदीप दिग्दर्शित संता-बंता आणि स्वरा भास्करच्या निल बटे सन्नाटा आदी चित्रपटांना पहिल्या आठवड्यातच फारसे यश मिळाले नव्हते. यातील निल बटे सन्नाटाला गंभीर चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांची पसंती लाभली तसेच मिडियाकडूनही त्याची प्रशंसा झाली. तथापि, बॉक्स आॅफिसवर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. संता-बंता हा चित्रपट विरोधामुळे मुंबई, पंजाबसह अनेक ठिकाणी प्रदर्शितच होऊ शकला नाही. रणदीप हुडाच्या लाल रंगलाही बॉक्स आॅफीसवर प्रभाव पाडता आला नाही. १६० कोटी रूपयांच्या व्यवसायासह मोगली आजही बॉक्स आॅफिसचा किंग आहे तर किंग खान अर्थात शाहरुख खानचा फॅन हा चित्रपट ८२ कोटी रूपयांच्या पुढे सरकण्यासाठी संघर्ष करताना दिसतो. येत्या शुक्रवारी मनोज वाजपेयीचा ‘ट्रॅफिक’, सनी लिओनचा ‘वन नाइट स्टॅण्ड’ आणि विक्रम भट्ट चा ‘१९२० लंडन’ हा भयपट... असे काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.