Join us

मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 13:48 IST

मराठी अभिनेत्याने घेतली हार्दिकची बाजू, रोहित शर्माच्या फॅन्सला संतापत म्हणाला, "त्याने आजपर्यंत..."

सध्या देशात IPL फिव्हर आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामातील सामन्यांमध्ये जोरदार रंगत पाहायला मिळत आहे. आयपीएलमध्ये दमदार संघ असलेल्या आणि ५ ट्रॉफी नावावर केलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे चाहते मात्र सध्या नाराज आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद दिल्याने रोहित आणि MIच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलच्या सामन्यात स्टेडियमवर रोहितच्या चाहत्यांकडून हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. यावरुन मराठी अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. 

मराठी अभिनेता पुष्कर जोगने नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोमवारी(१ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल सामना वानखेडेवर खेळवला गेला. यावेळी नाणे फेकीच्या वेळी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या असं म्हणताच स्टेडियमधील चाहत्यांनी रोहित शर्मा असं म्हणायला सुरुवात केली. हा व्हिडिओ शेअर करत पुष्कर जोगने संतप्त पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्याने रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खडे बोल सुनावले आहेत. 

"ही वागणूक चुकीची आहे...हे आता खूप अती होतंय. हार्दिक देशाचं प्रतिनिधित्व करतो. त्याने आजपर्यंत कित्येक सामने जिंकवून आपल्याला आनंदाचे क्षण दिले आहेत. रोहित शर्माचे फॅन असणं ही चांगली गोष्ट आहे. पण, कोणत्याच भारतीय क्रिकेटरला अशी वागणूक मिळता कामा नये. हार्दिकने जे केलं ते कदाचित बरोबर नसेल. पण, आपल्या भारतीय क्रिकेटरचा अपमान करणं हे अत्यंत चुकीचं आहे," असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, आयपीएलच्या १७व्या हंगामातील तिनही सामन्यांत मुंबईचा दारुण पराभव झाला आहे. आतापर्यंत मुंबईला यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात करता आलेली नाही. आता मुंबईचा पुढचा सामना रविवारी(७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रंगणार आहे. आता या सामन्यात मुंबईला विजय मिळवता येतो का, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :हार्दिक पांड्याआयपीएल २०२४रोहित शर्मापुष्कर जोगमुंबई इंडियन्स