इरफान खानचा आज वाढदिवस असून त्याने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या मालिकांमध्ये काम केले होते. त्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली.
इरफानला काही महिन्यांपूर्वी न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराचे निदान झाले होते. पण आता या आजारावर मात करत इरफानने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला आहे. इरफानचा जन्म 7 जानेवारी 1967 ला जयपूरमधील एका सामान्य कुटुंबात झाला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो अभियक्षेत्राकडे वळला. त्याने आजपर्यंत लाइफ इन मेट्रो, पान सिंह तोमर, द लंचबॉक्स यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. इरफानला आज अभिनयक्षेत्रात प्रचंड यश मिळाले असून त्याच्या यशामागे एका खास व्यक्तीचा हात आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नी सुतापा सिकंदर आहे.
इरफानने अतिशय मेहनतीवर आज त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. इरफानचे शिक्षण झाल्यावर तो घराची जबाबदारी सांभाळेल असे त्याच्या कुटुंबियांना वाटत होते. पण त्याला अभिनयात करियर करायचे असल्याने त्याने कोणत्याही क्षेत्रात नोकरी न करता अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करायला सुरुवात केली. त्याचदरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले. इरफान मानसिकदृष्ट्या खचलेला असताना त्याला एका मुलीने साथ दिली. त्याच्यासोबत तिने एक टेलिफिल्म बनवली, हीच टेलिफिल्म पाहून त्याला गोविंद निहलानी यांनी अभिनयक्षेत्रात संधी दिली. हीच मुलगी त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात त्याच्या पाठिशी उभी राहिली. ही मुलगी म्हणजेच त्याची पत्नी सुतापा.