बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार घेतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान उपचारासाठी लंडनमध्ये आहे. पण आता इरफान लवकरच भारतात परतणार आहे. होय, स्पॉट ब्यॉयने दिलेल्या वृत्तानुसार, इरफान नाशिकला येणार आहे आणि नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान शिवाजी पूजा बांधणार आहे.
इरफान किती तारखेला येतोय, याबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. पण ही भेट दोन दिवसांची असेल, असे कळतेय. यानंतर इरफान लगेच लंडनला रवाना होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही इरफानचे उपचार पूर्ण झालेले नाहीत. पुढील वर्षी मार्चपर्यंत ते संपतील आणि इरफान काम सुरू करू शकेल, असे सांगितले जातेय. अर्थात यासाठी इरफानला डॉक्टरांचे निर्देश व सूचनांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
इरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. गत मार्चमध्ये इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता. त्याने एक सावलीचा फोटो शेअर करत सोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो. तो एका जळत्या वातीसारखा आहे. ज्याच्या सावलीखाली आपण चालत असतो. आयुष्यात जे काही होतंय, ते होऊ द्या. मग ते चांगले असो वा वाईट. फक्त चालत राहा. कारण कुठलीही भावना अखेरची नाही. यालाच आयुष्य म्हणतात... ’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.