बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) आज या जगात नसला तरी तो त्याच्या चित्रपटांमधून जिवंत आहे. इरफान खान याच्या पश्चात त्याची पत्नी सुतापा आणि दोन मुलं बाबिल आणि अयान आहेत. बाबिल (Irrfan Khan Son Babil) देखील मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये त्याचा जम बसवत आहे. बाबिलचं भारतासाठी ऑस्कर जिंकण्याचं स्वप्न आहे.
बाबिल खानने नुकतंच पीटीआयशी संवाद साधला. यावेळी वडिलांबद्दल बोलताना तो भावूक झाला. बाबिल म्हणाला, "मी विद्यापीठातून परतल्यावर बाबांसोबत वेळ घालवणार होतो. मला खरोखर वाटलं नव्हतं की ते आम्हाला सोडून जातील. आईलाही वाटलं होतं की ते १०० टक्के बरे होतील. त्यांनी कर्करोगावर मात केली होती. पण, केमोथेरपीमुळे त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं".
अभिनय क्षेत्रातील त्याच्या स्वप्नांबद्दल बोलताना बाबिल म्हणाला, "मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर ट्रॉफी मिळवायची आहे. मला स्वतःला एक अभिनेता म्हणून सिद्ध करायचं आहे. त्यानंतर मी अभिनयातून एक पाऊल मागे घेईल आणि संगीतामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल". यासोबतच बाबिलने तो स्वत:ला कोणत्याही एका व्यवसायाशी बांधून ठेवू इच्छित नसल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "कधीकधी आपण आयुष्यात काय करायचं हे आधीच ठरवतो. मी फक्त २६ वर्षांचा आहे आणि आयुष्यभर हेच करेन असे सांगून स्वतःवर दबाव आणू इच्छित नाही".
बाबिलच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, त्यानं २०२२ मध्ये 'काला' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. लवकरच तो ZEE5 च्या 'लॉग आउट' चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तो एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या भूमिकेत आहे. जो रोमांचक मिस्ट्री ड्रामा आहे आणि यामध्ये रसिक दुग्गल आहे. या चित्रपटाचा प्रीमियर १८ एप्रिलला होणार आहे.