विनोद खन्नांचा फोटो पाहून इरफानला धक्का, गरज पडल्यास करणार अवयवदान
By Admin | Published: April 7, 2017 11:47 AM2017-04-07T11:47:38+5:302017-04-07T11:49:41+5:30
विनोद खन्ना यांच्यावर उपचार करण्यासाठी माझ्या शरिरातील एखादा अवयव दान करण्याची गरज भासली तर आपण त्यासाठी तयार असल्याचं इरफान खानने सांगितलं आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - अभिनेता विनोद खन्ना यांचा रुग्णालयातील फोटो पाहून इरफान खानला धक्का बसला आहे. आगामी चित्रपट "हिंदी मीडिअम" चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना इरफान खानने आपल्या भावना व्यक्त केल्या. विनोद खन्ना यांची प्रकृती नाजूक असून त्यांचा फोटो पाहून आपल्याला खूप मोठा धक्का बसल्याचं इरफान खान बोलला आहे. "जर विनोद खन्ना यांच्यावर उपचार करण्यासाठी माझ्या शरिरातील एखादा अवयव दान करण्याची गरज भासली तर आपण त्यासाठी तयार असल्याचंही", इरफान खानने सांगितलं आहे.
"विनोद खन्ना लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी देवाकडे मी प्रार्थना करतो. त्यांच्यावर उपचारादरम्यान जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी तयार आहे. माझा अवयवही दान करण्याची तयारी आहे. विनोद खन्नांसाठी माझ्या आयुष्यात एक विशेष जागा आहे. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत दोन अत्यंत सुंदर हिरो आहेत, त्यातील एक म्हणजे धर्मेद्र आणि दुसरे विनोद खन्ना. मी आज सकाळीच त्यांचा रुग्णालयातील फोटो पाहिला आणि मला धक्काच बसला. त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. मी विनोद खन्नांचे सर्व चित्रपट पाहिले आहेत. मला आठवतं "खून पसीना" चित्रपटात त्यांचे डोळे लाल होते. ते नेहमी लाल दिसावेत यासाठी त्यांनी काहीतरी केलं होतं", अशा आठवणी आणि भावना इरफान खानने व्यक्त केल्या आहेत.
शुक्रवारी रात्री बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांना शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गिरगावातील एचएन रिलायन्स फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण आहे. फोटोमध्ये ते अगदीच अशक्त झाल्याचे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
आता त्यांची प्रकृती ठिक असून त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती विनोद खन्ना यांचा मुलगा राहुलनं दिली आहे. राहुलनं हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, डॉक्टर आणि हॉस्पिटल कर्मचा-यांचा मी खूप आभारी आहे. हॉस्पिटलमध्ये बाबांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेण्यात आली. प्रकृतीत चांगल्या गतीनं सुधारणा होत असल्यानं त्यांना लवकरच डिस्चार्ज देणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.
विनोद खन्ना यांनी "मेरे अपने", "कुर्बानी", "पूरब और पश्चिम", "रेशमा और शेरा", "हाथ की सफाई", "हेरा फेरी", "मुकद्दर का सिकंदर" यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये "मन का मीत" या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत "दिलवाले" या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. चित्रपटसृष्टीत नाव, यश, प्रसिद्धी कमावल्यानंतर विनोद खन्ना राजकारणाकडे वळले. राजकारणाच्या मैदानातही ते यशस्वी ठरले. सध्या ते पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे खासदार आहेत.