छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे इशा केसकर (Isha Keskar). 'जय मल्हार' या मालिकेच्या माध्यमातून इशा घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर इशाने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. इशाच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, अलिकडेच एक मुलाखतमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्यावर भाष्य केलं.
इशाने नुकतीच 'स्वराज'च्या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आई-वडिलांविषयी अनेक खुलासे केले. माझं बलपण पाळणाघरातच गेलं असं तिने सांगितलं.
''माझे वडील देवाधर्माचं फार काही करत नाहीत पण त्यांना वाचनाची खूप आवड. मी घरची आर्थिक बाजू सांभाळू शकत नाही त्यामुळे घरची जबाबदारी घेतो हे त्यांनी खूप लवकर स्वीकारलं आणि माझा सांभाळ केला. हे फार घरांमध्ये होत नाही. मी माझ्या आई-वडिलांना उशिर झालेलं अपघाती बाळ आहे. मी १० वर्षांची असताना माझे वडील ५० वर्षांचे होते. वडील पदवीधर होते. त्याच जोरावर ते नोकरी करत होते. पण, त्यांनी करिअरमध्ये फारसं काही केलं नाही. पण, आईने तिच्या करिअरमध्ये चांगली संधी मिळवली.त्यामुळे आईने घरची आर्थिक बाजू सांभाळली आणि बाबांनी घरची जबाबदारी घेतली. पण, मी १३ वर्षांची होते तेव्हा हे सगळं झालं. नाहीतर, त्यापूर्वी माझं सगळं बालपण पाळणाघरात गेलं", असं इशा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी सहा महिन्यांची होते तेव्हापासून मी पाळणाघरात वाढले. माझा सांभाळ माझ्या आई-वडिलांनी कधीच केला नाही. मी झोपेत असतानाच मला ते पांघरुणात गुंडाळून पाळणाघरात न्यायचे. तिचे माझे सकाळी डोळे उघडायचे. तिथेच माझं सगळं आटोपून मी शाळेत जायचे. त्यामुळे वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वयापासून मला स्वत:ची काम स्वत: करायची सवय लागली. बालवाडीपासून मुली वयात येईपर्यंत मी पाळणाघरात राहिले. माझं पाळणाघर बंद झाल्यानंतर वडिलांनी रिटायरमेंट घेतली. मग मला जेवू घालण्यापासून ते अभ्यास घेईपर्यंत त्यांनी सगळं केलं. जे एक आई करते ते माझ्या वडिलांनी केलं."
दरम्यान, या मुलाखतीमध्ये इशाने तिच्या बालपणाविषयी अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. इशाने आज तिच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्थान निर्माण केलं आहे. जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांसह सरला एक कोटी या सिनेमातही ती झळकली आहे.