अभिनेत्री ईशा कोप्पिकरला (Isha Koppikar) 'क्रिश्ना कॉटेज' सिनेमामुळे लोकप्रियता मिळाली. ईशाने अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केलं. मात्र काही वर्षांनंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली. काही दिवसांपूर्वी ईशाने पती टिम्मी नारंगसोबत घटस्फोट घेतला. सध्या ती एकटीच लेकीचा सांभाळ करत आहे. नुकतंच एका मुलाखतीत ईशाने कास्टिंग काऊचची भयानक आठवण सांगितली.
काही महिन्यांपूर्वी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीतील ईशाचं विधान व्हायरल होतंय. कास्टिंग काऊचबद्दल विचारल्यावर ईशा म्हणते, "हो, १८ वर्षांची असताना मला कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. एकदा सेक्रेटरी आणि एकदा अभिनेत्याकडूनही मला हा अनुभव आला आहे. तुला अभिनेत्यांसोबत 'फ्रेंडली' व्हावं लागेल. एकदा एका अभिनेत्याने मला सांगितलं की एकटी भेटायला ये. ड्रायव्हरलाही घेऊन येऊ नको. आधीच माझ्याबद्दल काही कॉन्ट्रोव्हर्सी सुरु आहेत. हे स्टाफचे लोकच माझ्याबद्दल अफवा पसरवत आहेत. मग मी त्याला सांगितलं की सॉरी, मी एकटी येऊ शकत नाही. तो बॉलिवूडचा ए लिस्टर अभिनेता होता. तेव्हा मी २२ वर्षांची असेन. कधी काही जण हात पकडून सांगायचे की तुला हिरोसोबत फ्रेंडली राहावं लागेल. एखाद्याने हे फक्त सांगणं आणि एखाद्याने हात धरुन सांगणं यात खूप फरक आहे."
ईशा कोप्पिकरने २००९ साली टिम्मी नारंगसोबत लग्नगाठ बांधली होती. १४ वर्षांनी त्यांचा संसार मोडला. घटस्फोटासाठी अर्ज करण्याच्या आधीपासूनच ती लेकीला घेऊन वेगळी झाली होती. यावर्षी ईशा 'आयलान' या तमिळ सिनेमात दिसली.