Join us

"असं नातं नकोच जिथे त्याला...", घटस्फोटाबद्दल बोलताना ईशा कोप्पिकरच्या डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:29 IST

ईशाला ७ वर्षांची एक मुलगीही आहे.

'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकरचा (Isha Koppikar) गेल्यावर्षीच पती टिम्मी नारंगसह घटस्फोट झाला. त्यांनी आपला १३ वर्षांचा संसार मोडला. ईशाला ७ वर्षांची रिआना ही मुलगीही आहे. घटस्फोटाच्या अर्ज दाखल करण्याआधीच ईशा लेकीसह टिम्मी नारंगचं घर सोडून गेली होती. घटस्फोटाचं दु:ख पचवणं ईशासाठी खूप अवघड झालं होतं. तिने नुकतंच एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या.

'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाविषयी बोलताना ईशाच्या डोळ्यात पाणी आलं. ती भावुक होत म्हणाली, "आमच्यात कोणतंही भांडण झालं नाही. पण आम्हाला माहित होतं की आम्ही हळूहळू एकमेकांपासून दुरावत चाललो आहोत. आमच्या मुलीला रिआनाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मग एक दिवस आमच्या घटस्फोटाची बातमीच आली. तेव्हा मी आणि माझी मुलगी दुबईत होतो. आम्ही फ्लाईटमध्ये असताना रिआनाने जेव्हा पेपरमध्ये बातमी वाचली तेव्हा मी तिला हे सांगितलं. आम्ही रिआनाचं कोपॅरेंटिंग करणार हे टिम्मी आणि मी आधीच ठरवलं होतं."

ती पुढे म्हणाली, "टिम्मी घरी येतो. आम्ही अजूनही व्हॅकेशनवर जातो. पार्टी अटेंड करतो. हे सगळं आम्ही रिआनासाठीच करतो. पण आता आमच्यात काहीच नाही. आईवडिलांनी आम्हाला एकत्र राहून पाहा, गोष्टी सोडवायचा प्रयत्न करा असं सांगितलं. पण आता ते होणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला आपण नको आहे. एखाद्या नात्यात सर्वात दु:ख देणारं काय असतं तर जेव्हा दोघंही खूश नसतो. ज्याला माझ्यासोबत राहायचीच इच्छा नसेल तर ठिके मलाही त्याच्यासोबत राहायला आवडणार नाहीच. हे स्वीकारायला खूप वेळ लागतो पण शेवटी ते होतं."

ईशाचा EX पती टिम्मी बिझनेसमन आहे. ईशाचं सुद्धा स्वत:चं रेस्टॉरंट आहे. सध्या ईशाची मुलगी तिच्याजवळ राहते. ईशाने 'क्रिश्ना कॉटेज', 'क्या कूल है हम', 'एक विवाह ऐसा भी' यासारख्या काही सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :इशा कोप्पीकरबॉलिवूडघटस्फोट