बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरने त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना भेटवस्तू दिली आहे. चाहते ईशानच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. ईशानच्या वाढदिवशी त्याच्या पिप्पा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पिप्पा या दिवाळीत १० नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इतिहासातील एका ऐतिहासिक क्षणाची रोमांचक कथा आहे.
१९७१ची पार्श्वभूमी असलेला 'पिप्पा' हा हिंदी चित्रपट थेट डिजिटली रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. राजा कृष्ण मेनन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात ईशान खट्टर युद्धातील खराखुरा नायक कॅप्टर बलराम सिंह मेहतांच्या भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, प्रियांशू पेन्युली आणि सोनी राजदानही आहेत. या चित्रटाची कथा १९७१मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या गेलेल्या गरीबपूरच्या लढाईवर आधारलेली असल्याचं समजतं.
ब्रिगेडियर बलराम सिंह मेहता यांच्या 'द बर्निंग चॅफ़ीज़' या पुस्तकावरून राजा मेनन, तन्मय मोहन आणि रविंदर रंधावा यांनी 'पिप्पा'ची कथा लिहिली आहे. या सिनेमाला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या अॅक्शन थ्रिलरचे शीर्षक पाण्यावर सहजपणे तरंगणाऱ्या आणि तुपाच्या रिकाम्या डब्यासारख्या दिसणाऱ्या तसेच 'पिप्पा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या उभयचर वॉरफेअर टँक पीटी-७६ (पलावुशी टँक) वरून ठेवण्यात आलं आहे.