लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: चंद्रयान-३ च्या चंद्रावरील धडाकेबाज एन्ट्रीनंतर अलम विश्वात भारताचे कौतुक आणि भारतीयांच्या मनात देशाभिमान उसळी मारत असतानाच या सगळ्या माहोलमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांनीही छाप पाडली आहे. आर. माधवन दिग्दर्शित ‘रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट’ या इस्रो शास्त्रज्ञाच्या जीवनावरील सिनेमाची सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
वर्ष २०२१ साठी ६९वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यात ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटासाठी निखिल महाजन यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावला आहे. तेलुगू चित्रपट ‘आरआरआर’ला निखळ मनोरंजनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अल्लू अर्जुनला ‘पुष्पा-द राईज’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर आलिया भट (गंगुबाई काठियावाडी) आणि कृती सेनन (मिमी) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.
बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ची राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिल्या जाणाऱ्या नर्गिस दत्त पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
मणिपुरी चित्रपटाची दखल
‘बियाँड ब्लास्ट’ या मणिपुरी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, ईशान्य भारताकडे लक्ष वेधणाऱ्या ‘फायर ऑन एज’लाही पुरस्कार मिळाला.
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : एकदा काय झालं (दिग्दर्शक - सलील श्रीनिवास कुलकर्णी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : निखिल महाजन (गोदावरी)
- ज्युरी पुरस्कार : रेखा (दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे)