Join us  

अस्ताद म्हणतोय... हिंदी नको रे बाबा

By admin | Published: March 25, 2016 1:37 AM

चित्रपट अन् मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अस्ताद काळे म्हणतोय, सध्या तरी हिंदी मालिका अन् चित्रपट नकोत.

चित्रपट अन् मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून घराघरांत पोहोचलेला अभिनेता अस्ताद काळे म्हणतोय, सध्या तरी हिंदी मालिका अन् चित्रपट नकोत. आता असे काय झालेय, की अस्तादला हिंदीत जायचे नाही. यासंदर्भात सीएनएक्ससोबत बोलताना अस्ताद म्हणतो, मी आत्तापर्यंत चित्रपट अन् १८ मालिकांमध्ये चांगलं काम केलं आहे. माझ्या वाट्याला मराठीमध्ये चांगल्या भूमिका आल्या आहेत अन् चांगल्या भूमिका मला यापुढेदेखील करायच्या आहेत. नोकराच्या किंवा ड्रायव्हरच्या भूमिकेमध्ये अडकायचं नाही, तर दर्जेदार अभिनयातून प्रेक्षकांसमोर येऊन त्यांचं मनोरंजन करायचं आहे. आजच्या मालिका या स्त्रीप्रधान जरी असल्या, तरी सध्या पुरुषांना त्यामध्ये तितकाच महत्त्वाचा रोल असतो. उगाचच दाखवायचं म्हणून एक-दोन सीनमध्ये दाखवलं जात नाही. एका नाटकाच्या तालमी वेळी आम्ही प्रशांत दामले यांच्याशी बोलत असताना मी सहज त्यांना विचारलं की, तुम्हाला हिंदीत जायचं नाही का? तर, त्यांनी सांगितलं, मी आज मराठीत ड्रायव्हरच्या सीटवर बसलो आहे, तर उगाचच कंडक्टर बनायला का जाऊ? त्यांच्या या वाक्यामुळे आम्ही खरंच इन्स्पायर झालो आणि हे खरंच आहे. हिंदीत जाऊन दुय्यम रोल करण्यापेक्षा मराठीत चांगल्या दर्जेदार भूमिका मला करायच्या आहेत.