Join us

स्त्रीवादी चित्रपट भावतात

By admin | Published: April 07, 2017 2:12 AM

गायिका, अभिनेत्री, गीतकार आणि लेखिका अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या.

-गीतांजली आंब्रे

लोकसंगीतापासून पॉप गाण्यांपर्यंत प्रत्येक जॉनरची गाणी ईला अरुण यांनी आपल्या आवाजात खुलवली. गायिका, अभिनेत्री, गीतकार आणि लेखिका अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. ‘बेगम जान’ चित्रपटातून त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाल्या आहेत. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद. या चित्रपटाचा ट्रेलर खूपच प्रभावशाली वाटला. तुमची या चित्रपटात काय भूमिका आहे?- स्त्रीवादी विषयांवरील चित्रपट मला नेहमीच भावतात. भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये ज्या वेळी फाळणी झाली, त्या वेळी अनेक घरांची विभागणी झाली. यात काहींचे घर भारतात राहिले, तर काहींचे पाकिस्तानात गेले. याचा आधार घेत एका काल्पनिक विषयावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान एका कोठ्याचीही फाळणी होते. या कोठ्याची मालकीण विद्या बालन असते. कोठ्यावर आल्यानंतर विद्या पहिला हात पकडते तो अम्माचा. या अम्माची व्यक्तिरेखा मी साकारत आहे. तशी मी या चित्रपटात एक सरप्राईज एलिमेंट आहे. अम्मा ही विद्याच्या कमजोर क्षणाची ताकद असते. अम्मा आणि विद्याचे भावनिक संबंध असतात. हा चित्रपट तसा माझ्यासाठी एक यू टर्न होता. श्याम बेनेगल यांच्या ‘मंडी’ या चित्रपटाद्वारे मी इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. जवळपास ३५ वर्षांनंतर स्त्रीवादी चित्रपटात मी काम करतेय. त्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मी फ्लॅशबॅकमध्ये गेले होते. शादी के साईड इफेक्ट या चित्रपटानंतर जवळपास तीन वर्षांनतंर तुम्ही चित्रपटात दिसताय. एवढा मोठा गॅप का घेतला?- किती वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतते आहे याचा मला काहीच फरक नाही पडत नाही. मी कधीच काम मागायला कोणाकडे जात नाही. मात्र, माझ्याकडे येणाऱ्या भूमिका मात्र मी नक्की स्वीकारते. मी कामात इतकी व्यग्र असते, की पडद्यावर कधी आले आणि कधी गेले, याकडे फारसे लक्ष देत नाही. या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये मी दोन चित्रपट केले आहेत. जे अजून प्रदर्शित झालेले नाहीत. यातला एका चित्रपट आहे गवल्लू. या चित्रपटची कथा जरा हटके आहे आणि त्यातली माझी भूमिकाही जरा वेगळी आहे. जूनपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वत: गायिका आहात. आजच्या जमान्यातील संगीताबद्दल तुम्हाला काय वाटते?- सगळे चांगले काम करत आहेत. अरजीत सिंगसारखे व्हर्सटाईल गायक इंडस्ट्रीत आहेत. अनेक नवीन चांगले आवाज कानावर ऐकायला येत आहेत. तसेच, आजच्या तरुणाईला ज्या प्रकारचे संगीत आवडते, तेच चित्रपटांमध्ये ऐकायला मिळते. तुमच्या ‘व्होट फॉर घागरा’ या अल्बमला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. तो अनुभव कसा होता? - मी खूप रॅप केले आहे आणि या अल्बममध्येसुद्धा रॅप म्युझिकचा वापर केला आहे. सात मिनिटांचा रॅप यात आहे आणि त्याचे बिट्सही मॉर्डन आहेत. मला नहेमीच काही तरी इनोव्हेटिव्ह आणि नवीन करायला आवडते.