रसिकांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून कर्तव्य - अशोक सराफ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 07:33 PM2024-02-28T19:33:22+5:302024-02-28T19:37:06+5:30
संगीत नाटक अकादमी पुरस्कार घोषित झाल्यावर अशोक सराफ यांनी व्यक्त केली भावना
मुंबई - नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नवी दिल्लीतील नॅशनल अकॅडमी ऑफ म्युझिक, डान्स व ड्रामाच्या वतीने अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत अशोक सराफ यांनी 'लोकमत'शी एक्सक्लुझिव्ह संवाद साधताना मायबाप रसिकांचे मनापासून आभार मानले.
प्रथम महाराष्ट्र भूषण आणि आता संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळणे, यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणता असू शकतो. माझ्याकडे आता भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ५० वर्षांच्या माझ्या कारकिर्दीची या निमित्ताने दखल घेऊन हा पुरस्कार घोषित झाला. ही माझ्या दृष्टिने खरोखर खूप मोठी गोष्ट आहे. अभिनयातील हा मोठा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी सुखद धक्का आहे. रसिकांनी केलेल्या प्रेमामुळेच हा मिळाला आहे. तुम्ही चांगले काम करत आहात, असेच काम करत राहा असे प्रेक्षक आम्हाला म्हणतात म्हणून आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांचे मनोरंजन करणे हे नट म्हणून आमचे कर्तव्य ठरते, असे अशोक सराफ यांनी सांगितले.
मामा गोपीनाथ सावकार हे माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून जे मिळाले ते रसिकांसमोर सादर केले. त्यांचा आशीर्वाद कायम आहेच, पण धाकटा बंधू सुभाषनेही खूप सपोर्ट केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात मी घरी नसायचो. त्या वेळी संपूर्ण कुटुंब त्याने सांभाळले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची झळ माझ्यापर्यंत पोहोचू दिली नाही. लग्नानंतर निवेदिताने कुटुंब सांभाळत घराला आकार दिला. या सर्वांचे माझ्या जडणघडणीत खूप मोलाचे योगदान आहे. शेवटी मी हे प्रेक्षकांसाठी केले. त्यांनी मला समजून घेतल्याने मोठा झालो, असे अशोक सराफ म्हणाले.
मी काम करत राहिलो आणि त्यांनी माझ्या कामावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. या कलेत एकट्याला कधीच यश मिळत नाही. यात लेखक, दिग्दर्शक, सह कलाकार, अगदी बॅकस्टेजला काम करणाऱ्या सर्वांचा सहभाग असल्याने त्यांचाही या पुरस्काराला हातभार लागला आहे. 'मी बहुरुपी' हे पुस्तक काढण्यात निवेदिताचा मोलाचा वाटा आहे. या पुस्तकात मी कुठेही कोणाला उपदेश केला नाही. कोणाची उणी-धुणी काढली नाहीत. कोणावर आरोप केले नाहीत. या प्रवासात जे चांगले लोक भेटले त्यांच्याबाबतच लिहिले आहे. माझ्या जीवनात जे सकारात्मक घडले ते लिहिल्याने लोकांना माझे स्पष्ट मत पटले असावे असे मला वाटते. हा पुरस्कार म्हणजे मी कायम माझ्या कामावर लक्ष केंद्रित केल्याची पोचपावती आहे, असेही मत अशोक सराफ यांनी व्यक्त केले.