तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या कलाकारांना गेल्या महिन्याभरात मिळाले आहेत हे धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:58 AM2018-07-12T11:58:58+5:302018-07-12T12:02:24+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या महिन्याभरात या मालिकेच्या कलाकारांना अनेक दुखद धक्के मिळाले आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. या मालिकेतील सोसायटी ही खरीखुरी सोसायटी असून या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा या खऱ्याखुऱ्या आहेत असेच आता लोकांना वाटू लागले आहे. या मालिकेतील कलाकारांसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत असेच म्हणावे लागेल. कारण गेल्या महिन्याभरात या मालिकेच्या कलाकारांना अनेक दुखद धक्के मिळाले आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी 9 जुलैला मीरा रोड मधील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले होते. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथची भूमिका साकारत होते. पण त्यांनी ही मालिका सोडल्यामुळे २००८ मध्ये कवी कुमार आझाद यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते.
कवी कुमार आझाद यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणजेच ११ जूनला बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची तब्येत ढासळली असल्याने त्याच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. या शस्त्रक्रिया यशस्वीदेखील झाल्या होत्या. पण अचानक त्यांचे निधन झाले तर ४ जूनला या मालिकेत अय्यरची भूमिका साकारणाऱ्या तनुज महाशब्देच्या आईचे इंदोरमध्ये निधन झाले. शैला या गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यामुळे तनुज चित्रीकरण सांभाळून अनेकवेळा इंदोरला जात होता. तनुज हा मुंबईत राहात असला तरी त्याचे कुटुंबिय गेल्या अनेक वर्षांपासून इंदोर मध्ये राहात आहे. आईच्या निधनानंतर तुनज गेल्या कित्येक दिवसांपासून कुटुंबियांसोबत इंदोरमध्ये राहात होता. त्यामुळे त्याने २० दिवसांचा ब्रेक देखील घेतला होता.